राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन
अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट; धरणातून विसर्ग सुरू
पुणे /प्रतिनिधी
राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून, कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिह्यांत शनिवारी अतिवृष्टी झाली. याबरोबरच राज्यात सर्वदूर पाऊस होत असून, शनिवारीही रायगड, पुणे - सातारा जिह्यातील घाट क्षेत्रात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मंगळवारपर्यंत काही जिह्यात रेड अलर्ट राहणार आहे.
उत्तर पूर्व अरबी समुद्रात गेले दोन दिवस कमी दाबाचा पट्टा होता. या पट्ट्याची तीव्रता आता कमी झाली असून, त्याचे द्रोणीय स्थितीत रूपांतर झाले आहे. याशिवाय गुजरात ते केरळपर्यंत ट्रफ कायम आहे. तसेच अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून, त्याची तीव्रता वाढत आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस परतला असून, पुढील काही दिवस अनेक भागात दमदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
शनिवारी या भागांमध्ये अतिवृष्टी
शनिवारी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील अनेक भागात अतिवृष्टी झाली, तर पुणे-सातारा जिह्यातील घाट क्षेत्रात ही पावसाचा जोरदार मारा होता. पालघर,ठाणे, मुंबई,कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, अकोला,अमरावतीलाही मुसळधार पावसाने झोडपले. राज्यात इतर भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
आजही रेड अलर्ट
रविवारीदेखील राज्याच्या अनेक भागात चांगला पाऊस राहणार आहे. यात रायगड, पुणे - सातारा जिह्यातील घाट क्षेत्रात अतिरिक्त पावसाचा इशारा आहे, तर ठाणे, पालघर,मुंबई,रत्नागिरी,नाशिक, जळगाव जिह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. सोमवारी तसेच मंगळवारी कोकण,मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने अनेक धरणातून विसर्ग करण्यात आला. बहुतांश धरणात आता समाधानकारक साठा झाला आहे.
राज्यातील पावसाची तीव्रता तीन दिवस
राज्यातील पावसाची तीव्रता 3 दिवस कायम कायम असेल.मंगळवारपर्यंत काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस असेल.
अनेक राज्यात रेड अलर्ट
उत्तर प्रदेशतील कमी दाबाचे क्षेत्र सरकत असून, यामुळे मध्य प्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र, गुजरात राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.