Solapur News : अतिवृष्टी- पूरग्रस्तांच्या उभारीसाठी लवकरच पॅकेजची घोषणा ; पालकमंत्र्यांची माहिती
पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची शासनाची भूमिका
सोलापूर : अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात अभूतपूर्व असे नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची माहिती येण्यास अजून विलंब लागणार आहे. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणांत झाले असल्याचे दिसून येत असल्याने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून विशेष पॅकेजची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार १५० दिवसांच्या विशेष सेवा उपक्रमांतर्गत शनिवारी सात रस्ता येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अनुकंपा तत्त्वावरील व एमपीएससीकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियुक्तीचे आदेश पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची व पूरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडून करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसांपासून तातडीच्या उपाययोजना करीत आहे. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीर असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. राज्य शासनाकडुन याबाबत लवकरच विशेष पॅकेजही जाहीर होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसी प्रवर्गावर कोठेही अन्याय होणार नाही याचा विश्वास ओबीसी प्रवर्गाला देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गाच्या कोणत्याही हक्कावर गदा येणार नाही याचीही दक्षता राज्य शासन यानिमित्ताने घेत असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.