कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाचे थैमान
सखल भागात पाणीचपाणी : अतिउत्साही पर्यटकावर जिल्हा प्रशासनाकडून अंकुश लावण्याची नितांत आवश्यकता
कारवार : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून किनारपट्टीवर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणीचपाणी झाले आहे. अरबी समुद्रासह किनारपट्टीवर प्रति तास 45 ते 50 कि. मी. वेगाने वारे वाहत असल्यामुळे अरबी समुद्र प्रक्षुब्ध बनून राहिला आहे. त्यामुळे उंच उंच लाटा किनाऱ्याकडे झेपावत आहेत. पर्यटकांनी किनाऱ्याकडे धाव घेऊन नये म्हणून ‘लाल बावटे’ लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा काही पर्यटक त्याच्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात मौजमजा करण्यासाठी उतरून संकटे ओढवून घेत आहेत असे सांगण्यात आले. अशा अतिउत्साही पर्यटकावर जिल्हा प्रशासनाने अंकुश लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अरबी समुद्राने रौद्ररुप धारण केल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात उतरणे धोक्याचे बनून राहिले आहे. तर मासेमारीसाठी यापूर्वीच उतरलेल्या होड्या समुद्रातील धोका ओळखून किनाऱ्याकडे परतू लागल्या आहेत.
मासेमारीच्या ऐन हंगामात व्यवसाय ठप्प
येथील बैतखोल भागात पारंपरिक पद्धतीने मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या मासेमारीच्या ऐन हंगामात विश्रांती घेत आहेत. तर बैतखोल मच्छीमारी बंदरात आणि येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर सुमारे 250 इतक्या यांत्रिक मासेमारी होड्या विश्रांती घेत आहेत. यामध्ये स्थानिक होड्यासह मंगळूर, मालपे, तामिळनाडू, गोवा येथील होड्यांचा समावेश आहे. मासेमारीच्या ऐन हंगामात मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने मच्छीमारी बांधवांना प्रत्येक दिवशी लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. याशिवाय मासळीप्रेमींची पंचाईत झाली आहे ती वेगळी. कारवार तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे तोडूर, अरगा येथे घरामध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रशासन सज्ज
अतिमुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने एसडीआरएफची पथके आणि होड्या सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांना स्थलांतर करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास गंजी केंद्रे सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास गंजी केंद्रे सुरू करण्याची स्थळे निश्चित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात एकूण 450 मि.मी. पाऊस
रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासात एकूण 450 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सुमारे दीड ते पावणेदोन महिने पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील नाले, ओढ्यांनी तळ गाठला होता. तथापि आता पुन्हा एकदा पाऊस कोसळत असल्याने नाले, ओढे, धबधबे प्रवाहित झाले आहेत. नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणामध्ये वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात (कद्रा 10,499 क्युसेक्स, सुपा 13619 क्युसेक्स, लिंगनमक्की 11,738 क्युसेक्स) वाढ होत आहे.
जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून किमान आणखी दोन दिवस पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.