तालुक्याच्या पूर्व भागाला जोरदार पावसाने झोडपले
बसवण कुडची, निलजी, कलखांब, मुचंडीत पावसाचा तडाखा : शिवारांमध्ये पाणीच पाणी
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागाला मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढल्याने परिसरात पाणीच पाणी झाले. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, मुतगा, कणबर्गी, कलखांब, मुचंडी आदी परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. हा पाऊस इतका जोरदार होता की काही क्षणातच परिसरात पाणी साचले. सुमारे दोन तासभर पावसाने झोडपून काढले. तर सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, अष्टे, चंदगड, खणगाव, मोदगा, सुळेभावी आदि गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
पिकांचे प्रचंड नुकसान
हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. तर कोथिंबीर, काकडी आदि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
बसवण कुडची मंदिर परिसराला तलावाचे स्वरूप
पावसाचा जोर इतका होता की ऐन उन्हाळ्यात बसवण कुडची येथील जागृत देवस्थान श्री बसवेश्वर-कलमेश्वर मंदिर परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले होते. दुपारी चार वाजता सुरू झालेल्या पावसाचा मारा सायंकाळी सहापर्यंत सुरूच होता. सायंकाळी उशिरापर्यंत मंदिर परिसरात पाणी साचून राहिले होते. तर बसवण कुडची, निलजी, मुतगा परिसरातील शिवारामध्ये पाणी साचले होते.