कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाचे थैमान
रेड अलर्ट : शाळा, महाविद्यालयांना सुटी : कुमठा, होन्नावर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने कारवार जिल्ह्यात शनिवार दि. 26 रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात शनिवार दि. 26 रोजी अतिमुसळधार म्हणजे 204 मि. मी. हून अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार दि. 26 रोजी जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी जिल्ह्यातील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, जोयडा आणि दांडेली या तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना, पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. तथापि नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे.
यावर्षी पावसाचा हंगाम सुरू झाल्यापासून किनारपट्टीवरील तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना एक दिवस सुटी देण्यात आली आहे. पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालयांना शनिवारी पहिल्यांदाच सुटी देण्यात आली आहे. किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात गेले अनेक दिवस कोसळणाऱ्या पावसाने जनतेला सळो की पळो करून सोडले आहे. किनारपट्टीवरील वाहणाऱ्या काळी, गंगावळी, अद्यनाशिनी, शराबी, शरावती आदी प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
कुमठा तालुक्यात तर शुक्रवारी पावसाने हैदोस घातला आहे. कुमठा तालुक्यातून वाहणाऱ्या चंद्रप्रभा, बडगणी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वालगळ्ळे ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील उरकेरी, केळगीनकेरी, हरीजनकेरी ही गावे जलमय झाली आहेत. या गावातील सतरा घरामध्ये पाण्याने घुसखोरी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी निघून जाण्याच्या सूचना
शरावती नदीवरील लिंगनमक्की जलाशयात 60 हजार क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे. या जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 1819 फूट इतकी असून शुक्रवारी ही पातळी 1806.80 फूट इतकी झाली असून जलाशय 75.13 टक्के इतके भरले आहे. जलाशयातील पाणी कुठल्याही क्षणी शरावती नदीच्या पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्याकरिता होन्नावर तालुक्यातील शरावती नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्य करून राहणाऱ्या नगरिकांनी जनावरे आणि घरगुती साहित्यासह सुरक्षित स्थळी निघून जाण्याची सूचना कर्नाटक विद्युत महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे. किनारपट्टीवरील पावसाच्या थैमानामुळे अनेक घरे जलमय झाली आहेत. त्याकरिता एकूण 254 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये कारवार, कुमठा आणि होन्नावर तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 708 मि.मी. पाऊस
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 59 मि. मी. आणि एकूण 708 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद अशी (सर्व आकडेवारी मि.मी. मध्ये) : अंकोला 78, भटकळ 109, हल्याळ 9, होन्नावर 93, कारवार 82, कुमठा 105, मुंदगोड 16, सिद्धापूर 90, शिरसी 73, यल्लापूर 31, सुपा 39 आणि दांडेली 16.