कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाचे थैमान
होन्नावर तालुक्यातील अनेक गावे जलमय : गिरसप्पा-लिंगनमक्की जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हैदोस घातला आहे. त्यामुळे या पाच तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवारी सुटी जाहीर करण्यात आली होती. होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या शरावती नदीची उपनदी असलेल्या गुंडबाळ नदीला पूर आल्याने आणि शरावती नदीवरील गिरसप्पा व लिंगनमक्की जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने होन्नावर तालुक्यातील सरळगी, हेरंगडी, मेलीन इडगुंजी, जळवळ्ळी, गुंडबाळ चिक्कनगोड, होसकुळी, खाखा, बेरोली, हडीनबाळ, मुगवा ही गावे जलमय झाली आहेत. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यासाठी 15 निवारा केंद्रांची व्यवस्था केली आहे. या काळजी केंद्रांमध्ये 129 कुटुंबातील 368 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
यामध्ये 158 पुरुषांचा, 169 महिलांचा आणि 42 बालकांचा समावेश आहे. किनारपट्टीवरील कारवार आणि अंकोला तालुक्याच्या तुलनेत कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात जनतेला पावसाने सळो कि पळो करून सोडले आहे. कुमठा तालुक्यातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्ण जलमय बनून गेले आहे. गोकर्णमधील प्रत्येक रस्त्याला पावसाच्या पाण्यामुळे नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पावसामुळे कुमठा तालुक्यातील मादनगेरी ते गोकर्ण दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे गोकर्णकडे धाव घेणाऱ्या भाविकांची पंचायत झाली आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा जलाशयातून 61 हजार 457 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर लिंगनमक्की जलाशयातून 42 हजार 642 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या दोन प्रमुख धरणांमध्ये अनुक्रमे 53,471 क्युसेक्स आणि 38 हजार 931 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक होत आहे.
पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
दरम्यान भारतीय हवामान खात्याने कारवार जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्टची घोषणा केली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात भटकळ तालुक्यात 147 मि.मी., होन्नावर तालुक्यात 113 मि.मी. आणि कुमठा तालुक्यात 80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फार मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसला आहे. मत्स्य व्यवसायामुळे होणारी मोठी उलाढाल थंडावली आहे.