मुसळधार पावसाने शहराला झोडपले
हिडकल, राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीतही वाढ
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळनंतर शहर आणि परिसराला झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले. बाजारपेठेतील गर्दी देखील ओसरली. सायंकाळच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे काम आटोपून घरी जाणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यंदा अवकाळी पावसाने सुरुवातीपासूनच जिल्ह्याला झोपडून काढले आहे. मान्सूनपूर्व पावसानेदेखील जोरदार हजेरी लावल्याने भुजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. जिल्ह्यातील सात बंधारे सध्या पाण्याखाली गेले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. हवामान खात्यानेही यंदा अधिक पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी हंगाम साधला. रविवारी रात्री काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. सोमवारी सकाळपासून उघडीप दिली. दुपारी तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर सायंकाळी 6.30 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.