कारवार किनारपट्टीवर पावसाचे थैमान
जनजीवन ठप्प : आज अंगणवाडी-शाळांना सुटी
कारवार : भारतीय हवामान खाते आणि कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र बेंगळूरने वर्तविलेला अंदाज सत्यात उतरला असून कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. हवामान खात्याने आणि व्यवस्थापन केंद्राने गुरुवारपासून 14 तारखेपर्यंत रेड अलर्ट घोषित केला होता. तथापि बळीराजाने बुधवारी दुपारपासूनच किनारपट्टीला झोडपून काढायला सुरुवात केली आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका कारवार तालुक्याला बसला आहे. सुदैवाने अद्याप तरी जीवित हानीची नोंद झालेली नाही. तथापि प्रचंड प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे.
बुधवारी दुपारपासून मोहीम उघडलेल्या पावसाने रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान आपला वेग वाढविला. ढगफुटीसदृश कोसळलेल्या पावसाने कारवार नगरासह बैतखोल, बीणगा, सदाशिवगड आदी प्रदेशाला जलमय करून टाकले आहे. कारवार नगराला वेढलेल्या डोंगरावर अतिमुसळधार पाऊस कोसळल्याने माती, दगड, लाकडे आदी पाण्याबरोबर वाहून आली आहेत. कारवार तालुक्यातील वैलवाडा येथे काही तासांतच 267 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कारवार तालुक्यातील शिरवाड येथे 261 मि. मी., कडवाड येथे 249 मि. मी., अमदळ्ळी येथे 234 मि.मी. आणि माजाळी येथे 194 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
2009 मधील ढगफूटीची आठवण करून देणारा पाऊस
2 ऑक्टोबर 2009 मध्ये कारवारात ढगफूटीसदृश पाऊस पडला होता. त्यावेळी संपूर्ण कारवार शहर बुडाले होते. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे 2009 मधील परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील हब्बुवाडा रस्ता, केएचबी कॉलनी, बसडेपो परिसर गीतांजली चित्रपटगृहासमोरील रस्ता, न्यायालय परिसर, राघवेंद्र मठ रस्ता, भांडीशीट्टा जलमय झाला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक घरामध्ये दुकानामध्ये पाणी घुसले आहे. काही दुकानांच्या गोडाऊनमध्ये पाण्याने घुसखोली केल्याने मोठी हानी झाली आहे. शहरातील काही अपार्टमेंटमधील पार्कींग एरीयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यात अडकून पडली आहेत.
जिल्हा रूग्णालयात घुसले पाणी
येथील जिल्हा रूग्णालयात पाणी घुसल्याने रूग्णांची फार मोठी पंचाईत झाली आहे. रूग्णालयातील कॉरीडर वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने महिला, जनरल वॉर्डमधील रूग्णांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे.
बैतखोल येथे घर कोसळले
डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा लोंढा बैतखोल येथील मालिनी पेडणेकर यांच्या घरावरून गेल्याने घर कोसळून लाखो रूपयांची हानी झाली आहे. वेळीच पेडणेकर कुटुंबियानी घरातून पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले.
मातीखाली गाढल्या गेल्या होड्या
येथून जवळच्या बैतखोल समुद्र किनाऱ्यावर पारंपारिक पद्धतीने मासेमारी करण्याच्या होड्या आणि जाळी घेण्यात आली होती. अति मुसळधार पावसामुळे पाण्याबरोबर माती वाहून आल्याने किनाऱ्यावर ठेवण्यात आलेल्या होड्या आणि जाळी गाढली गेली आहेत. यामुळे मच्छीमारी बांधवाची फार मोठी हानी झाली आहे. मातीखाली गाढल्या गेलेल्या होड्या बाहेर काढण्यासाठी मच्छीमारी बांधव प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते.
झोपायची जागा बदलली आणि कुटुंबीय वाचले
अंकोला तालुक्यातील शिवपुर येथील देवीगौडा यांच्या मालकीच्या घरावर बुधवारी रात्री जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झाड कोसळून मोठी हानी झाली आहे. तथापी बुधवारी रात्री देवीगौडा सुक्रीदांपत्य आणि तीन बालकांनी झोपायची जागा बदलल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय हमरस्त्यावर वाहने थांबविण्यावर बंदी
जिल्ह्यातील राष्ट्रीय हमरस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या भुस्खलनाच्या जागा जिल्हा प्रशासनाने निश्चित केल्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी पावसाचा हंगाम संपेपर्यंत वाहने न थांबविण्याचा आदेश जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी बजावला आहे.
पुढील सहा दिवस रेड अलर्ट
भारतीय हवामान खात्याने पुढील सहा दिवस (18 जूनपर्यंत) कारवार जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उद्या (ता.13) कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी सुट्टी जाहीर केली आहे. गुऊवारीही सुट्टी देण्यात आली होती.