बाळेकुंद्री खुर्दला पावसाचा जोरदार तडाखा
सतत तीन दिवस अस्मानी संकट : कोथिंबीर, शेपू, मिरची पिके जमीनदोस्त : पंचवीसहून अधिक झाडे उन्मळून पडली : वीजखांबही झाले आडवे
वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून कोथिंबीर, शेपू ,मिरची ही पिके जमीनदोस्त झाली आहेत तर पंचवीसहून अधिक झाडे उन्मळून पडली असून दहा ते बारा विद्युत खांबही पडले आहेत. त्यामुळे शिवारातील विद्युत वाहिन्या लोंबकळत असून विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. सलग तीन दिवस झालेल्या पावसाने बाळेकुंद्री खुर्द गावावर अस्मानी संकट कोसळले असून शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला आहे .सलग तीन दिवसापासून बाळेकुंद्री परिसराला पावसाने झोडपून काढले आहे .गुरुवारी झालेल्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले असून वादळी वारा व गारांचा प्रचंड वर्षावामुळे हाता तोंडाशी आलेली कोथिंबीर, शेपू, मिरची ही पिके जमीनदोस्त झाली आहेत तर शिवारातील 25 हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत.
शिवारातील वीजपुरवठा ठप्प
दहा ते बारा विद्युत खांब कोसळले असून वीज वाहिण्या तुटल्या आहेत. त्यामुळे शिवारातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. अशातच शुक्रवारी पुन्हा दुपारी तीन नंतर जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शिवारात पाणी साचले आहे. बाळेकुंद्री खुर्द गाव मिरची कोथिंबीर, शेपू ही पिके घेण्यासाठी तालुक्यातच अग्रेसर आहे .यंदाही ही पिके मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली आहेत.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
मात्र सलग तीन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे. महागडी बी बियाणे तसेच भांगलन आदी केली होती. हातातोंडाशी आलेल्या पिकांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
गारांचा वर्षांव
बाळेकुंद्री खुर्द परिसराला सलग तीन दिवस पावसाने झोडपून काढले. वादळी वारा व गारांचा वर्षाव यामुळे हातात तोंडाशी आलेली कोथिंबीर शेपू पिकांचे नुकसान झाले असून शिवारात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
- प्रकाश पाटील, शेतकरी, बाळेकुंद्री खुर्द
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
गुरुवारच्या पावसाने शेपू, मिरची ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वारा व गारांचा वर्षाव यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
-किरण हलगी, शेतकरी बाळेकुंद्री खुर्द.

