जिल्ह्यात मुसळधार,सर्व नद्यांना पूर
सातारा, नवारस्ता, पाचगणी :
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच कोयनेसह उरमोडी, कण्हेर, धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक मोठी वाढली आहे. त्यामुळे सर्वच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आह. नदी काठच्या गावांना इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक लहान पूल पाण्याखाली जावू लागले आहेत. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात कराड, पाटणसह अनेक गावात पाणी शिरण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.
- कोयनेतून 31 हजार 746 क्युसेक विसर्ग
गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असल्याने पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून साडे सहा फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात 31 हजार 746 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला असल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. कोयना नदीवरील महत्वपूर्ण असलेल्या मूळगाव पुलाला सायंकाळीच पाणी टेकले असून कोणत्याही क्षणी हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. परिणामी नदीपलीकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान रविवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 85.29 टीएमसी पर्यंत पोहोचला आहे.
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ 19 टीएमसी पाण्याची गरज असताना कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात प्रतिसेकंद 54 हजार 801 क्युसेक या वेगाने पाणी वाढत आहे. परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता 5 फुटांवर उचलण्यात आले; मात्र तरीही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच राहिल्याने रविवारी सायंकाळी पाच वाजता पुन्हा दीड फूट वाढवून धरणाचे दरवाजे एकूण साडे सहा फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 29 हजार 646 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक असे मिळून एकूण 31 हजार 746 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.
कोयनेतील विसर्ग आणि पाऊस यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. कोयना नदीवरील संगमनगर धक्का जुना पूल, निसरे फरशी पूल हे पूल पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, पाटण शहराला जोडणाऱ्या कोयना नदीवरील मूळगाव पुलालाही घासून पाणी चालले असल्याने रात्री उशिरा कोणत्याही क्षणी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वाढल्याने हा पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे नदीपलीकडील मूळगाव, कवरवाडी, त्रिपुडी, चोपडी, डोंगरोबाचीवाडी या गावांचा पाटण शहराशी संपर्क तुटला आहे.
या गावातील वाहतूक बेलवडेमार्गे नवारस्ता आणि पाटण अशी वळविण्यात आली आहे. सध्या मूळगाव पुलावरून पाणी वाहणार आहे. त्यामुळे पुलावरून वाहने अथवा पायी जाण्याचे धाडस करू नये, नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन करून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
- नवजा, महाबळेश्वरला पावसाने 3 हजाराचा टप्पा पार केला
कोयना पाणलोट क्षेत्रात सध्या संततधार पाऊस कोसळत असल्याने अवघ्या दोन महिन्यात पाणलोट क्षेत्रातील नवजा आणि महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर पावसाने 3 हजार मिलिमीटर इतक्या पावसाचा टप्पा रविवारी म्हणजे 27 जुलै रोजीच पार केल्याचे दिसून आले. कोयनानगर पर्जन्यमापन केंद्रावरही पाऊस तीन हजारच्या उंबरठ्यावर आहे. या केंद्रावर सरासरी वार्षिक पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते.