राज्यात 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस
बेंगळूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुढील 24 तासांत बेंगळूर परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीवरील कारवार, उडुपी आणि मंगळूर जिल्ह्यांत 29 सप्टेंबरपर्यंत मध्यम व साधारण पावसाचे अनुमान आहे. उत्तर कर्नाटक भागातील रायचूर, कोप्पळ, बागलकोट, विजापूर, यादगीर, कलबुर्गी व बिदर जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर बळ्ळारी बेंगळूर, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हासन, कोडगू, मंड्या, कोलार, म्हैसूर आणि रामनगर या दक्षिणेतील जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. येत्या आठवड्यात बागलकोट, बिदर, कलबुर्गी, कोप्पळ, रायचूर, विजापूर व यादगीर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 27 सप्टेंबरपासून शिमोगा, कोडगू, हासन, चिक्कमंगळूर, मंगळूर, कारवार आणि उडुपी जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.