तालुक्याच्या पूर्वभागात जोरदार पावसामुळे भातकापण्या ठप्प
शिवारात पुन्हा पाणी साचल्याने भातकापण्या लांबणीवर पडण्याची शक्यता
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये गेल्या काही दिवसापासून तुरळक प्रमाणात भात कापणीला सुरुवात झाली होती. मात्र गुरुवारपासून पुन्हा सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे भातकापण्या ठप्प झाल्या असून पुन्हा शिवारात पाणी साचले आहे. त्यामुळे भातकापण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होन्निहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदी भागामध्ये गेल्या काही दिवसापासून भात कापणीला प्रारंभ करण्यात आला होता. तर दिवाळीनंतर भात कापणीला वेग येणार होता. मात्र गुरुवारपासून हवामानात बदल होऊन जोरदार पावसाला प्रारंभ झाल्याने शिवारात पुन्हा पाणी साचले आहे. त्यामुळे भात कापण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवार पुन्हा जलमय
या भागातील बासमती भातपीक हे सध्या कापणीला आले असून इतर भातपिकेही येत्या आठ दिवसात कापणीला येणार आहेत. असाच पाऊस पडत राहिल्यास भातकापणी वेळेवर होणार नाही. परिणामी भात झडून पिकाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पूर्वभागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तर शुक्रवारी दुपारी या भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली होती व अधूनमधून पावसाच्या सरी सुरूच आहेत. त्यामुळे शिवार जलमय झाले आहे. नाल्यांच्या पाणीपातळीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे.