कोयना, नवजा, महाबळेश्वरमध्ये पावसाची हजारी पार
नवारस्ता :
पाटण तालुक्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला. मात्र कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक प्रतिसेकंद 25 हजार 922 क्युसेक इतकी झाली आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू असून बुधवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 43.09 टीएमसी झाला आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात जूनपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथील तीनही पर्यन्यमापन केंद्रावर जून महिना संपण्यापूर्वीच पावसाने हजारी ओलांडली आहे.
गेल्या आठवड्यापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा पावसाच्या संततधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक वाढत असून बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत ती प्रतिसेकंद 25 हजार 922 इतकी झाली
- कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सरासरी गाठेल
कोयना पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे अवघ्या महिनाभरातच पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर पर्जन्यमापकांवर पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा बुधवारी पार केला. या पाणलोट क्षेत्रात सरासरी प्रतिवर्षी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षीही पाणलोट क्षेत्रात पाऊस सरासरी इतकाच कोसळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- पाणलोट क्षेत्र वगळता जोर मंदावला
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्र वगळता पाटण तालुक्यातील पाटण, मोरगिरी, मणदूरे, तारळे, ढेबेवाडी आणि मल्हारपेठ विभागात बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे या विभागात सकाळपासूनच पावसाची उघड झाप सुरू होती. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना 22 (1084) मिमी, नवजा 13 (1052) आणि महाबळेश्वर 54 (1092) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.