For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणात पावसाने दाणादाण,जनजीवन विस्कळीत

06:17 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोकणात पावसाने दाणादाण जनजीवन विस्कळीत
Advertisement

आकाशच फाटलं, तर ठिगळ कुठे लावायचं, अशी परिस्थिती सध्या कोकणात निर्माण झाली आहे. अख्ख्या जून महिन्यात पडला नाही, तेवढा पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांत कोसळला आहे. या पावसामुळे बहुतांश धरणे तुडुंब भरून गेल्याने धरणातून विसर्ग सुरू केला आहे. सर्वच नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. अशा या पूरसदृश परिस्थितीमुळे मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीमही बोलवाव्या लागल्या. दोन दिवस शाळांनाही सुट्टी द्यावी लागली. वर्षा पर्यटनावरही परिणाम झाला आहे. सततच्या या पावसाने कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणसाठी अतिवृष्टी ही काही नवीन नाही, परंतु अतिवृष्टीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला आता अडथळे ठरू लागल्याने कोकणात वारंवार पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

Advertisement

कोकणातील पाऊस हा 3400 ते 3600 मि. मी. च्या वार्षिक सरासरीने पडतो. राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. परंतु कोकणातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. पावसाचे पाणी थांबत नाही. ते वेगाने समुद्राला जाऊन मिळते. परंतु गेल्या काही वर्षांत पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. विकासाच्या नावाखाली इमारत बांधकामे उभी राहू लागली आहेत. गटारांवरही बांधकामे केली जात आहेत. नद्या, नाल्यांमध्ये भरलेला गाळ काढला जात नाही. याचा परिणाम म्हणूनच पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूर हा येतोच, परंतु मानवी हस्तक्षेपामुळेही वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. तीन वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये आलेल्या पुराचा सर्वांनीच अनुभव घेतला आहे.

कोकणातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती पाहता वाढत्या गंभीर परिस्थितीमुळे एनडीआरएफच्या जवानांच्या टीमसुद्धा कोकणात मदत व बचाव कार्यासाठी दाखल झाल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी मदत, बचाव कार्य करीत आहेत. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्ते खचलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क तुटला आहे.

Advertisement

पुराचे पाणी ओसरले नसल्याने भात शेतीचेही फार नुकसान झाले आहे. दोन्ही जिल्ह्यात तीन हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील भात शेती पाण्याखाली असल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेकडो घरांची पडझड झाली आहे. काही घरे जमीनदोस्त होऊन संसार उघड्यावर आले आहेत. सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत एक शाळकरी मुलगी, तर सिंधुदुर्गात एक वृद्ध पुराच्या पाण्यात वाहून गेला. पोल्ट्रीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन हजाराहून अधिक केंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. एवढी गंभीर स्थिती असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र म्हणावी तशी अलर्ट दिसली नाही. या उलट नागरिकच पूरग्रस्तांच्या मदत व बचाव कार्यासाठी धावल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.

पावसाळा सुरू झाला की, कोकणातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील पर्यटकही कोकणात वर्षा पर्यटनासाठी पसंती देतात. परंतु, यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिना तसा कोरडाच गेला. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले नाहीत. त्यामुळे वर्षा पर्यटन बहरेल, अशी अपेक्षा असतानाच ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिल्याने वर्षा पर्यटनाला ब्रेक लागला. पूरस्थितीमुळे लोकांना घरातच थांबावे लागले. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यावर वर्षा पर्यटन बहरणार आहे, हे नक्की.

सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा सर्वांचाच आकर्षणाचा असल्याने या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी विक्रमी गर्दी होत असते. त्याशिवाय मांगेली, सावडाव असे अनेक छोटे-मोठे धबधबे पावसाळ्यात ओसंडून वाहत असतात आणि पर्यटक आनंदही लुटत असतात. काहीवेळा अतिउत्साहित पर्यटकांमुळे दुर्घटनाही घडतात किंवा अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्यास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे धबधब्यावर आनंद लुटताना सावध राहूनच आनंद घेतला पाहिजे. त्यादृष्टीने आता धबधब्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना मातीचा भराव घालूनच केले गेले. मोठे पूल किंवा मोऱ्या आवश्यक त्या प्रमाणात ठेवल्या नाहीत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. जसे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊन घरामध्ये पाणी घुसते, त्याप्रमाणे महामार्गालगतच्या गावातील घरांमध्येही वारंवार पाणी घुसण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्गालगत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्येही कधी नव्हे ती पूरस्थिती उद्भवली आणि आठ घरे जमीनदोस्त झाली.

कोकणमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा रेड अलर्ट असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जवळपास 300 घरांची पडझड होऊन काही घरे जमीनदोस्त झाली आहेत. फार मोठे नुकसान झाले आहे. पूरबाधितांना शासनाकडून तातडीची मदत मिळणे आवश्यक होते. मात्र कुणाला मदत पोहोचलीच नाही.

उलट लोकप्रतिनिधी व नागरिकांनीच मदत व बचावकार्य करीत पूरबाधितांची राहण्याच्या व्यवस्थेपासून जेवण, कपडे वगैरे सोय केली. कोकण रेल्वेवर फारसा मोठा परिणाम झाला नाही. मात्र काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात दरडी रेल्वेरुळावर येत असल्याने काही प्रमाणात रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या. एकूणच कोकणात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरबाधितांना मदत मिळण्यासाठी आता विधानसभा अधिवेशनात कोकणातील आमदारांनी आवाज उठविणे अपेक्षित आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.