कारवार जिल्ह्यात पावसाचे थैमान
नद्यांना पूर : अंकोला, कुमठा, होन्नावर तालुक्यातील शेकडो घरे जलयम
कारवार : जिल्ह्यात मौसमी पावसाने थैमान घातले आहे. घाटमाथ्यावरील यल्लापूर, शिरसी आणि सिद्धापूर तालुक्यात कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे किनारपट्टीवरील अंकोला, कुमठा, होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या गंगावळी, अद्यनाशीनी नद्यांना पूर आला आहे. अंकोला, कुमठा आणि होन्नावर तालुक्यातील शेकडो घरे जलमय झाली असून पूरग्रस्त नागरिकांसाठी गंजी केंद्रे उभारून त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या गुंडबाळ नदीला पूर आल्याने पूर प्रभावीत काही गावातील शाळांना आज गुरूवारी कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी सुटी जाहीर केली होती.
कुमठा-शिरसी राज्य हमरस्त्यावर कतगाल येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जिल्ह्यातील या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यल्लापूर तालुक्यात कोसळणाऱ्या धुवादार पावसामुळे गंगावळी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत असल्याने यल्लापूर तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. राज्यात सर्वात अधिक पावसाची नोंद (चोवीस तासात) जिल्ह्यातील दोडमणे ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत 366 मि. मी. इतकी झाली आहे. वाजगोड ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत 369.5 मि. मी. आणि कोडकणी येथे 366.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गंगावळी, अद्यनाशिनी नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली
होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या गुंडबाळ नदीला पूर आल्याने, चिक्कनकोड ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील हरोजनकेरी, हित्तलकेरी, येथील घरामध्ये पाणी घुसल्याने तेथील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. कुमठा तालुक्यातून वाहणाऱ्या अद्यनाशिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी तीरावरील घरामध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऐगळकवे येथील नागरिकांना गंजी केद्रात स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंकोला तालुक्यातून वाहणाऱ्या गंगावळी नदीला पूर आल्याने हडव, शिंगनमक्की बीळीहोयलू येथील अनेक घरे जलमय झाली आहेत. नागरिकांचे स्थलांतर करून सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
होन्नावर-बेंगळूर हमरस्त्यावर दरड कोसळली
जोरदार पावसामुळे होन्नावर-शिमोगा-बेंगळूर राष्ट्रीय हमरस्त्यावर होन्नावर तालुक्यातील वर्णकेरी येथे दरड कोसळली आहे. डोंगरावरील मातींच्या ढिगाऱ्यासह बृहतवृक्ष रस्त्यावर कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जोयडा तालुक्यातील काळीनदीवरील अप्पर कानेरी धरण भरण्याच्या मार्गावर असून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग कोणत्याहीक्षणी करण्यात येईल त्याकरिता धरणाच्या खालील बाजूस वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना केपीसीने सावधानतेचा इशारा दिला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 1116 मि. मी. व सरासरी 93 मि. मी. इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक पावसाची नोंद 168 मि. मी. इतकी सिद्धापूर तालुक्यात झाली आहे. अन्य तालुक्यातील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे. (सर्व आकडे मि. मी. मध्ये) अंकोला 89, भटकळ 94, होन्नावर 138, कारवार 120, कुमठा 135, शिरसी 110.
बेंगळूर येथून दोन तुकड्या दाखल
येत्या 3-4 दिवसांत कारवार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठविण्याची मागणी संबंधितांकडे करण्यात आली आहे. संबंधितांनी याची गांभीर्याने दखल घेऊन बेंगळूर येथून दोन तुकड्या कारवारच्या दिशेने निघाल्या आहेत. या दोन्ही तुकड्या आज कारवार जिल्ह्यात दाखल होणार असून, प्रत्येक तुकडीत 25 जवांनाचा समावेश आहे. अशी माहिती कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी दिली.
तीन तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आज सुटी
अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे कुमठा, होन्नावर, भटकळ तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना शुक्रवार दि. 5 रोजी सुटी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.