पुढील दोन दिवस कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस
अतिवृष्टीची शक्यता, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
कारवार : भारतीय हवामान खाते आणि कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती केंद्र (बेंगळूर)ने पुढील दोन दिवस 20 व 21 मे रोजी कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्याकरिता किनारपट्टीवासियांनी तसेच कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुकावासियांनी सतर्क राहण्याची सूचना कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात लक्ष्मीप्रिया म्हणाल्या, किनारपट्टीवर प्रतितास 40 ते 55 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. शिवाय मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे मच्छीमारी बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्यामुळे किनारपट्टीवरील केवळ खोल समुद्रातीलच नव्हेतर किनाऱ्यालगत पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारी मासेमारी ठप्प होणार आहे. त्यामुळे एक जूनपूर्वीच मच्छीमारी बांधवांना होड्या बंदरात नांगरण्याची वेळ येवून ठेपली आहे. मानवी जीवनावर पुढील दोन दिवस होणाऱ्या पावसाच्या परिणामांचा धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घ्यावयाचे काही खबरदारीचे क्रम सुचविले आहेत.
नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्त्कालीन कारवार मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पाणी साचणाऱ्या सखल प्रदेशापासून नागरिकांनी दूर रहावे, विशेष करून पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी. प्रवासी आणि नागरिकांनी नदीत, समुद्रात उतरु नये, शेतकऱ्यांनी पाऊस पडताना किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना शेतांची मशागत करू नये. पाऊस पडताना घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन काळात संपर्काचे आवाहन
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गरज असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या गंजी केंद्रांत सहारा घ्यावा. जीर्ण झालेल्या इमारती, घरे, भिंतीपासून नागरिकांनी दूर रहावे. तहसीलदारांकडून यापूर्वीच यादी तयार करण्यात आली आहे. ग्रामीण प्रदेशातील साकव, लहान पुलावरुन ये-जा करीत असताना काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी आपत्ती मॅनेजमेंट कंट्रोल रुम (08382-229857, मोबाईल क्रमांक 9483577075) किंवा संबंधीत तहसीलदार कार्यालयांना संपर्क साधण्याचे आवाहन पुढे जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी केले आहे.
-जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया