कारवार जिल्ह्यात पावसाचे थैमान
अंगणवाडी, प्राथमिक-माध्यमिक शाळा, पदवीपूर्व महाविद्यालयांना आज सुटी
कारवार : कारवार जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्सवाला उधाण आले असताना दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात बुधवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेडअलर्टची घोषणा केली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षततेच्या दृष्टिकोनातून कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर, जोयडा आणि दांडेली तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
मुसळधार पावसाच्या बरोबरीने प्रतितासी 35 ते 45 कि. मी. वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी जुने वृक्ष आणि जीर्ण घरापासून सावध रहावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. मासेमारी बांधवांनी समुद्रात उतरू नये, तसेच नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जावू नये, अशी सूचना करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, डोंगरांच्या उतरणीवर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. जिल्ह्यातील काळी, शरावती, गंगावळी, वरदा, अघनाशिनी आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नद्यांना कुठल्याहीक्षणी पूर येण्याची शक्यता असल्याने नदीच्या काठावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
लिंगनमक्की जलाशयातून 36 हजार क्युसेक विसर्ग
शरावती नदीवरील लिंगनमक्की जलाशयाचे अकरा दरवाजे उघडून 36 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे होन्नावर तालुक्यातील शरावती नदीच्या काठावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली. बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 648 मि. मी. आणि सरासरी 54 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद अशी अंकोला 75 मि. मी, भटकळ 54, हल्ल्याळ 9, होन्नावर 48, कारवार 114, कुमठा 89, मुंदगोड 13, सिद्धापूर 53, शिरसी 49, सुपा 60, यल्लापूर 41, दांडेली 18, जिल्ह्यात सर्वाधिक 150 मि.मी. पावसाची नोंद कारवार तालुक्यातील कद्रा येथे झाली आहे.