Rain Update Sangli: सांगलीत अतिवृष्टी, 24 तासात 33 मिमी पाऊसाची नोंद
चार तालुक्यात मुसळधार, धरणातील साठाही वाढू लागला
सांगली : मान्सूनच्या सुरूवातीलाच जोरदार बॅटींग सुरू केलेल्या पावसाने अलमट्टीसह सर्वच धरणातील पाणीसाठयात मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. शुक्रवारी रात्री बेडग, उमदी, कुंडल, पलूस, इस्लामपूर, कामेरी, शिराळा मंडलात अतिवृष्टीची नोंद झाले. मिरज, जत, वाळवा व पलूस या चार तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात अंदाजे सरासरी 33 मिमी पावसाची नोंद झाली. मान्सूनच्या दोन तीन दिवसांतील पावसाने शेती आणि पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली तरी शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
चोवीस तासात जिल्हयात 33 मिमी पावसाची नोंद झाली सात दिवसांत 70 मिमी पाऊस झाला आहे.
जून महिन्यातील सरासरीच्या 54 टक्के पाऊस पहिल्या सात दिवसात झाला. पावसामुळे सध्या जिल्हा ओलाचिंब झाला असून पश्चिम भागासह दुष्काळी भागातही जोरदार पाऊस सुरू आहे.
मिरज तालुक्यात चोवीस तासात 22.8 मिमी नोंद आहे. तर बेडग मंडलात 65.3 मिमी पाऊस झाला. दुष्काळी जत तालुक्यातही सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे. परंतु उमदी मंडलात 74.8 मिमी पाऊस झाला आहे. या तालुक्यात 35.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या 76.6 टक्के पाऊस झाला आहे.
खानापूर तालुक्यात 15.3 मिमी पाऊस झाला आहे.
वाळवा तालुक्यात एकूण 53.3 मिमी पावसाची नोंद आहे. पेठ, बहे, इस्लामपूर आणि कामेरीत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात शिराळा मंडलात अतिवृष्टीसह एकूण 45.1 मिमी पाऊस झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात 9.7 तर पलूस तालुक्यात 52.4 मिमी पाऊस झाला आहे. कुंडल आणि पलूस मंडलात अतिवृष्टी झाली आहे. कडेगाव तालुक्यातही 37.3 मिमी पाऊस झाला आहे.
पावसाच्या संततधारेने पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतींना सुरूवात केली होती. मान्सूनच्या सुरूवातीलाच पेरण्यांना सुरूवात झाली. सध्या सरासरी 38142 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणी योग्य क्षेत्र दोन लाख 55 हजार 984 हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी 15 टक्क्यांपर्यंत आहे. पण या तीन चार दिवसांत सुरू झालेल्या मुसळधारेमुळे खरीप हंगामाच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
अलमट्टी 51 टक्के, वारणा 40 तर कोयना 21 टक्के भरले
पाणलोट क्षेत्रात आणि क्षेत्राच्या बाहेरही पावसाने जोर धरल्याने धरणातील पाणीसाठयात वाढ होऊ लागली आहे. सांगली आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष असलेले अलमट्टी धरण 51 टक्के भरले आहे. 123 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात आतापर्यंत 62.81 टीएमसी साठा झाला आहे. गतवर्षी याचदिवशी धरणातील साठा 34 टक्के होता. याशिवाय कोयना धरणाचा साठा तेरावरून 21 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत हा साठा दहा टक्क्यांनी अधिक आहे. वारणा धरण 40 टक्के भरले असून गतवर्षीच्या तुलनेत 17 टक्के जादा साठा आहे.जून महिन्यापासून महाबळेश्वरमध्ये 116, नवजात 131 आणि सांगलीत 59.5 sमिमी पावसाची नोंद झाली आहे. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्राबाहेरही पावसाची दमदार हजेरी सुरू आहे.