जिल्ह्यात हेस्कॉमला पावसाचा जोरदार दणका
2900 विद्युत खांब कोसळले तर 489 ट्रान्स्फॉर्मर निकामी, अंदाजे 10 कोटी रुपयांचा फटका
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसाने हेस्कॉमला जोरदार दणका दिला आहे. केवळ आठ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने हेस्कॉमचे अंदाजे 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत खांब कोसळणे, ट्रान्स्फॉर्मर निकामी होणे, विद्युत वाहिन्या तुटणे यामुळे मोठा फटका हेस्कॉमला बसला आहे. रविवार दि. 21 पासून बेळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने धोकादायक वृक्ष व त्यांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्या. तसेच काँक्रिटचे खांब मोडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा बंद करावा लागला. हेस्कॉमच्या झालेल्या एकूण नुकसानापैकी 80 टक्के नुकसान हे धोकादायक वृक्षांमुळे झाले आहे. सततच्या पावसामुळे विद्युत खांबाखाली माती मऊ झाल्याने अनेक ठिकाणी खांब कोसळले.
हेस्कॉमच्या बेळगाव विभागात 301 विद्युत खांब, 70 ट्रान्स्फॉर्मर, 44 कि. मी. लांबीची विद्युती वाहिनी निकामी झाली. खानापूरमध्ये 274 विद्युत खांब, 23 ट्रान्स्फॉर्मर व 22 कि. मी. चे विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. याबरोबर सौंदत्ती, कित्तूर, बैलहोंगल, गोकाक, मुडलगी व रामदुर्ग या तालुक्यांमध्येही हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. चिकोडी विभागातील 51 विद्युत खांब, 59 ट्रान्स्फॉर्मर, निपाणी विभागात 40 ट्रान्स्फॉर्मर, 72 विद्युत खांब, अथणीमध्ये 6 ट्रान्स्फॉर्मर, 61 विद्युत खांब, रायबागमध्ये 4 ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2900 विद्युत खांबांचे नुकसान झाले असून 489 ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले आहेत. तर 107 कि. मी. लांबीच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाले. एकूण 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद हेस्कॉमकडे झाली आहे.
2850 विद्युत खांबांची दुरुस्ती
कोसळलेले विद्युत खांब दूर करून त्याठिकाणी दुसरे विद्युत खांब तातडीने बसविले जात आहेत. पडलेल्या 2962 विद्युत खांबांपैकी 2850 विद्युत खांबांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या खांबांची दुरुस्ती होणे अद्याप बाकी आहे. 489 ट्रान्स्फॉर्मर तसेच तुटलेल्या विद्युत वाहिन्या नव्याने बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे.
विद्युत खांब तातडीने बदलले
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर तसेच खांब ठिकठिकाणी कोसळले आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत खांब तातडीने बदलले जात आहेत.
- प्रवीणकुमार चिकाडे (अधीक्षक अभियंता)