कारवार जिल्ह्यात पावसाचा जोर सुरूच
चोवीस तासात सरासरी 15.6 मि. मी. ची नोंद
कारवार : कारवार जिल्ह्यात पावसाचा मारा सुरूच आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 15.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 58.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद 1.1 मि. मी. इतकी मुंदगोड तालुक्यात झाली आहे. यावर्षी कारवार जिल्ह्यात पावसाचे आगमन लवकर झाले. त्यामुळे मंगळवारअखेर सरासरीपेक्षा यावर्षी 24 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून कारवार तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कारवार येथील राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वर उभारण्यात आलेल्या फ्लायओव्हरखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे फ्लायओव्हर खालून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत मोठा व्यत्यय निर्माण होत आहे. फ्लायओव्हरखालील जागा वाहन पार्किंगसाठीही वापरली जाते. फ्लायओव्हरखाली पाणी साचल्याने वाहने पार्क करणाऱ्यांची तारांबळ उडत आहे. फ्लायओव्हरखाली पाणी साचायला राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 चे रुंदीकरण करणारी आय. आर. बी. कंपनी जबाबदार असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. आय.आर.बी. कंपनीच्या अवैज्ञानिक बांधकामामुळेच पावसाच्या हंगामात नागरिकांना फटका बसत आहे, असे सांगितले जात आहे.
बोगद्याजवळ मातीचे ढीग, दरड कोसळण्याच्या घटना
दरम्यान, पावसाळा सुरू होताच येथील लंडन ब्रिजजवळच्या बोगद्याच्या तोंडाजवळ मातीचे ढीग आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. कारवार आणि बिणगा दरम्यान राष्ट्रीय हमरस्ता क्रमांकावर बोगदे उभारण्यात आले आहेत. या बोगद्यांचे बांधकाम गेल्या वर्षीच पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी पहिल्या पावसाळ्यातच बोगद्याच्या तोंडाजवळ मातीचे ढीग आणि दरड कोसळली होती. त्यामुळे बोगद्यामधील वाहतूक बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. यावर्षीही गेल्या वर्षीची पुनरावृत्ती ओढवण्याची लक्षणे दिसून येत आहेत. ढीग आणि दरडी कोसळायला सुरुवात झाल्याने बोगद्यातून ये-जा करणाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या बोगद्यांची निर्मिती ही आयआरबी बांधकाम कंपनीकडून करण्यात आली आहे.
अन्य तालुक्यातील पावसाची नोंद (आकडेवारी मि. मी. मध्ये)
- अंकोला 18.4,
- भटकळ 38.9,
- हल्याळ 1.5,
- कारवार 20.4,
- कुमठा 31.3,
- सिद्धापूर 21.8,
- शिरसी 4.1
- सुपा 9.8,
- यल्लापूर 4.7
- दांडेली 2.9