महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवार जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच

10:22 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 पाण्याखाली :  इडूर येथील अनेक घरे जलमय : भटकळ तालुक्यातही महामार्गावर कोसळली दरड : आज शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

Advertisement

कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पाच तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सोमवार दि. 8 रोजी कारवारच्या नूतन जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी सुटी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे शनिवार दि. 6 रोजी या पाच तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. तत्पूर्वी अंकोला, कुमठा आणि होन्नावर तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. किनारपट्टीवरील तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे किनारपट्टीवर प्रतिसमुद्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण किनारपट्टी जलमय झाल्याने किनारपट्टीवरून जाणारा राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पावसाच्या पाण्याचा योग्यरित्या निचरा होत नसल्यामुळे कारवार तालुक्यातील चंडीया येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर पाणी आले आहे. शिवाय चंडीया ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील इडूर येथील अनेक घरे जलमय झाली आहेत. तेथील पूर पिडीतांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भटकळ तालुक्यातही काही ठिकाणी राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 पाण्याखाली गेला आहे. भटकळ जवळच्या रंगीनकट्टाला येथील राष्ट्रीय हमरस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कुमठा तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालगळ्ळी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील कोटेगुड्ड येथील रघु हम्मु मुक्री यांच्या मालकीचे घर जमीनदोस्त झाले आहे. घरातील सर्व जीवनपयोगी साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. त्यामुळे मुक्री कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला आहे. तर कोसळलेल्या घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.

दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच

दरम्यान पावसामुळे जिल्ह्यात दरडी कोसळण्याची मालिका सुरूच आहे. होन्नावर-बेंगळूर रस्त्यावरील वर्णकेरी (ता. होन्नावर) येथे दरड कोसळण्याची घटना ताजी असताना आज रविवारी होन्नावर तालुक्यातील कर्नलहील जवळ राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर दरड कोसळली. त्यामुळे होन्नावर-मंगळूर वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. पोलीस आणि आयआरबी बांधकाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड हटविली आणि वाहतूक सुरळीत केली. अंकोला, हुबळी दरम्यानच्या राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वर अरेबैल घाटात झाड कोसळल्याने या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीत काहीकाळ व्यत्यय निर्माण झाला होता. बेळगाव-कारवार रस्त्यावरील आनशी घाटातही दरड कोसळायला सुरूवात झाली आहे.

नऊ तारखेपर्यंत अति मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान पुढील दोन दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. किनारपट्टीवर प्रति तासी 55 ते 65 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. शिवाय साडेपाच मीटर उंचीच्या लाटा झेपावणार आहेत. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 606 मि.मी. आणि सरासरी 50.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक पावसाची नोंद 83 मि.मी. अंकोला तालुक्यात झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article