कारवार जिल्ह्यात पावसाचा पुन्हा धुमाकूळ
तालुक्यातील जनजीवन ठप्प होण्याच्या मार्गावर : हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट घोषित, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आजही सुटी
कारवार : गेल्या काही दिवसांपासून कारवार जिल्ह्यात अल्प प्रमाणात पडणाऱ्या मौसमी पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात जनजीवन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट घोषित केला असून पावसाचा जोर 8 जुलैपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि जोयडा तालुक्यांना पाऊस झोडपून काढीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर आणि जोयडा तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवार दि. 4 रोजी कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी सुटी जाहीर केली आहे.
शिरसी, सिद्धापूर आणि यल्लापूर तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टीवरून वाहणाऱ्या गंगावळी अघनाशिनी नद्यांमधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी जिल्हा प्रशासन या नद्यांमधील पाण्याच्या पातळीत बारीक नजर ठेवून आहे. काळी नदीवरील कद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला पाऊस अक्षरश: झोडपून काढत असल्यामुळे कारवार तालुक्यातील कद्रा धरणाने कमाल पाण्याची पातळी गाठली आहे. अतिरिक्त पाण्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये या उद्देशाने कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कद्रा धरणाचे चार दरवाजे गुरुवारी पावणे सहा वाजता उघडले आहेत.
काळी नदीच्या पात्रात 33 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
कद्रा धरणातून काळी नदीच्या पात्रात 33 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यापैकी धरणाचे चार दरवाजे उघडून 12 हजार क्युसेक्स पाण्याचा तर कद्रा येथील जलविद्युत प्रकल्पातील विद्युत जनित्राद्वारे विद्युत निर्मिती करून 21 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला आहे. कद्रा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कद्रा ते कारवार या पट्ट्यातील सुमारे 30 कि. मी. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून कद्रा धरणातील विसर्गामुळे काही खेड्यांना सतत फटका बसत आहे.
जिल्ह्यात चोवीस तासात तब्बल 948 मि.मी. पाऊस
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 79 मि. मी. आणि एकूण 948 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- (सर्व आकडेवारी मि. मी. मध्ये), अंकोला 103, भटकळ 68, हल्याळ 27, होन्नावर 51, कारवार 154, कुमठा 83, मुंदगोड 16, सिद्धापूर 112, शिरसी 101, सुपा 89, यल्लापूर 43 आणि दांडेली 36. दरम्यान, काळी नदीवरील सुपा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी होत असून या जलाशयात 35 हजार क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे तर शरावती नदीवरील लिंगनमक्की जलाशयात 45 हजार क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे.