राकसकोप जलाशय परिसरात पावसाची दमदार हजेरी
ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात जलाशयाचा दरवाजा उघडण्याची पहिलीच वेळ
वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीपातळी 1476 फुटावर गेली आहे.यावर्षी जलाशय परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागीलवर्षी एकूण 1693.50 मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र जवळजवळ दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. एकूण 3210.7 मि.मी. पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी पाणीपातळी 2476 इतकी नोंद झाली आहे. जलाशयाकडे येऊन मिळणारे नदी-नाले दोन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जलाशयाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढल्याने पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्याची मागणी तुडये येथील अरुण पाटील, सरपंच विलास सुतार, उपसरपंच अशोक पाटील, रमेश चव्हाण, प्रल्हाद हुलजी, तंटामुक्त समिती अध्यक्ष के. एस. पाटील, रतन पाटील, रामचंद्र गोडसे, सतीश पाटील यांनी जलाशय व्यवस्थापनाकडे केल्याने जलाशयाच्या वेस्टवेअरचा पाच क्रमांकाचा दरवाजा पाच इंचांनी उघडण्यात आला. त्यामुळे मार्कंडेय नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जलाशयाचा दरवाजा उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पाण्याची पातळी वाढल्याने शेतीपिकांचे नुकसान
पावसाच्या जोरामुळे पाणीपातळी 2477 फुटापर्यंत गेल्याने जलाशय काठावरील अनेक शेतकऱ्यांच्या रताळी व भातपिकात पाणी साचल्याने पिके कुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 254.3 मि.मी. पाऊस झाला आहे. मागीलवर्षी याच महिन्यात केवळ 24.7 मि.मी. पाऊस झाला होता.