Satara Rain Update : मान्सूनपूर्व पावसाचा खंडाळा तालुक्याला तडाखा; 18 लाखांचे नुकसान
महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसानीबाबत आढावा घेतला
By : इम्तियाज मुजावर
खंडाळा : गेल्या काही दिवसांपासून खंडाळा तालुक्यात मानसूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून या अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये 272 शेतकऱ्यांचे सुमारे 67 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यामध्ये 18 लाख 9 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पावसाची संततधार सुरू असल्याने तालुक्यात सुमारे 164.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकांबरोबर काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी शेत शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसानीबाबत आढावा घेतला.
यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाधित क्षेत्रांचे पंचनामे सुरू केले असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाने शेतीच्या कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेतली होती. परंतु सततच्या पावसामुळे शिवारातील पेरणी पूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला असताना, या नुकसानीने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.