चीनमध्ये अतिवृष्टीचा इशारा
12 कोटी लोक प्रभावित होणार : मदतकार्यासाठी सैन्याला पाचारण
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये सोमवारी अतिवृष्टी आणि पूर येण्याची शक्यता आहे. चीनच्या राष्ट्रीय हवामान विभागानुसार दक्षिण चीनच्या किनारी क्षेत्राला एक चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळावरून इशारा जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे चीनमध्ये शतकातील सर्वात मोठा पूर येऊ शकतो अशी भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर या पुरामुळे 12 कोटी लोक प्रभावित होणार असल्याचे अनुमान आहे.
चीनच्या किंगयुआन शहरात शनिवारपासूनच अतिवृष्टी होत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पाठविण्यात आले आहे. तर देशातील आपत्कालीन सेवा अलर्ट मोडवर आहेत.
गुआंग्शीच्या हेझोउ शहरात भूस्खलनाच्या 65 घटना घडल्या आहेत. 18 एप्रिलपासून गुआंग्डोंग शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक घरे पाण्यात बुडाली आहेत. सरकारने चक्रीवादळाचा धोका पाहता सागरी भागांमध्ये जाण्यावर बंदी घातली आहे. दक्षिण चीनमधील सर्वात मुख्य बेई नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीतील पुरामुळे अनेक नागरी वस्त्यांमध्ये 19 फूट उंचीपर्यंत पाणी शिरू शकते. याचबरोबर जियांग्शी आणि फुजियानमध्ये देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
शाळा बंद
चक्रीवादळाचा प्रभाव झाओकिंग, शोगुआन, किंगयुआन आणि जियांगमेन शहरांवरही दिसू लागला आहे. तेथे 12 तासांपासून पाऊस पडत आहे. झाओकिंग शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील दूरसंचार सेवाही कोलमडली आहे. गुआंग्डोंगमधील किंगयुआन आणि शोगुआनमध्ये मदतकार्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत संबंधित भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.