मंगळवारी पावसाची दमदार हजेरी
सोयाबीन, भुईमूग, बटाटा काढणी कामात व्यत्यय
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती. सोमवारी सायंकाळी पावसाचा केवळ शिडकावा झाला. मात्र मंगळवारी सायंकाळी शहरासह ग्रामीण भागातही दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले व व्यावसायिकांची काहीशी तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या या पावसामुळे साऱ्यांनाच आडोसा शोधावा लागला. हवामान खात्यानेही पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसभर कडक ऊन होते. सायंकाळी अचानकपणे ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. काही भागामध्ये जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
सध्या भातपिकासह सोयाबीन, भुईमूग, बटाटा ही पिके काढणीसाठी आली आहेत. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे. मात्र सायंकाळी होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. बटाटा आणि भुईमूगदेखील काढणी सुरू आहे. पण पावसामुळे काहीजणांनी हे काम थांबवले आहे. सध्या लव्ह्या जातीच्या भातांची सुगी करण्याच्या तयारीत शेतकरी आहे. मात्र पावसामुळे त्यांनी सुगीला सुरुवात केली नाही. भातकापणी केल्यानंतर पाऊस झाला तर पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातकापणी थांबवली आहे. पावसाने उघडीप दिली तर सुगीला सुरुवात होणार आहे.