महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शुक्रवारी सायंकाळी दमदार पाऊस

11:38 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहरासह उपनगरांत सर्वत्र पाणीच पाणी : व्यापाऱ्यांसह वाहनधारकांचीही पावसाने तारांबळ

Advertisement

बेळगाव : मान्सूनपूर्व पावसाने गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांना आणि ग्रामीण भागालाही झोडपून काढले आहे. गुरुवारी सायंकाळी दमदार पावसाने झोडपून काढल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. मात्र सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे आगमन झाले. पावसाने अक्षरश: झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. गटारी तुडुंब भरल्याने व काही ठिकाणी गटारी नसल्याने रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत होते. शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल दीड तासाहून अधिकवेळ पाऊस सुरूच होता. या पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अनेक गटारींमध्ये कचरा साचून गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. दमदार पावसामुळे बाजारपेठेतील बैठ्या व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. याचबरोबर दुचाकीस्वार,पादचारी यांनाही या पावसाचा फटका बसला.

Advertisement

दमदार पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. मान्सूनपूर्व पाऊस की मान्सूनचे आगमन या संभ्रमावस्थेत जनता आहे. यावर्षी वळिवानेही दमदार हजेरी लावली. त्यानंतर आता मान्सूनचेही लवकरच आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्रात काही भागामध्ये मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावातही मान्सून आला का? याची चर्चा सुरू होती. मात्र शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाल्याने हा वळिवाचाच पाऊस असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. मागील तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पावसाचे आगमन होत आहे. त्यानंतर बराचवेळ पावसाची रिपरिप होत आहे. यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून राहत आहे. शाहूनगर परिसरात तर रस्त्यावरून पाणी वाहत होते. गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरले आहे. यामुळे तारांबळ उडाली होती. गटारीमध्ये कचरा अडकल्याने तर काही ठिकाणी गटारीच नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. सध्या शेतकऱ्यांनी काही भागामध्ये पेरणी केली आहे. तर काही भागात मशागतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. भातपेरणी करून काही भागात उगवणही झाली आहे. त्यांना हा पाऊस फायदेशीर ठरला. पावसाने विश्रांती घेतली तर इतर कामांना पोषक वातावरण निर्माण होणार आहे. कोळपण (हुट्ट) घालणे सोपे जाणार आहे. मात्र त्यासाठी पावसाने उघडीप दिली पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात निकालात लागला आहे.

मनपा लक्ष देणार का?

शहर तसेच उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी गटारीतील कचरा काढण्यात आला नाही. तसेच अनेक ठिकाणी गटारीच नाहीत. त्यामुळे पाण्याला पुढे जाण्यासाठी वाटच नसल्याने अनेकांच्या कंपाऊंडमध्ये पाणी शिरत आहे. वळीव पावसानेच साऱ्यांची तारांबळ उडत असून मान्सूनचे आगमन झाले तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तेव्हा महानगरपालिकेने आताच लक्ष देऊन गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article