पावसाने उडविली दाणादाण
सर्वत्र पाणीच पाणी : पिकांचे मोठे नुकसान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह व्यावसायिकांना त्रास
बेळगाव : परतीच्या पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडवून दिली आहे. गुरुवारी पहाटे तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पाणीच पाणी झाले. सायंकाळीही पावसाने शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून होते. या पावसामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती. दसरोत्सवाच्या प्रारंभापासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. महत्त्वाचे म्हणजे हातातेंडाला आलेली पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. उभे असलेले भातपीक आडवे झाले आहे.
सोयाबीन पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजा हतबल झाला आहे. बुधवारी जोरदार सरी कोसळल्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. गुरुवारी मात्र पहाटेपासूनच पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले पुन्हा तुडुंब झाले आहेत. मार्कंडेय नदी तर दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. परतीच्या पावसाचा रुद्रावतार पाहून सारेच हतबल झाले आहेत. या पावसामुळे भातपीक कुजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गुरुवारी पहाटे, तसेच सायंकाळी झालेल्या पावसामुळे मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्याचा फटका बसला आहे. भिजतच दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहावे लागले.
ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होत होते. काही ठिकाणी विजेचा कडकडाटही होत होता. त्यामुळे शेतामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर पाऊस असल्यामुळे अनेकांनी परतीचा रस्ता धरला होता. या पावसामुळे रस्तेदेखील उखडून गेले आहेत. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. एकूणच परतीच्या पावसाने यावर्षी मोठे नुकसान केले आहे. बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते, तसेच फुलविक्रेते आणि इतर बैठ्या व्यापाऱ्यांची या पावसाने तारांबळ उडवून दिली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. काही ठिकाणी कामे सुरू आहेत. त्याठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. या पावसामुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे त्यामधून वाट काढताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून होते. पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाली होती.