विविध भागात जोरदार पाऊस
पुढील सहा दिवसांसाठी यलो अलर्ट जारी
पणजी : गोव्याच्या विविध भागात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी जोरदार पाऊस पडला. मात्र पणजी, मुरगाव, वास्को, म्हापसा या भागात मर्यादित वृष्टी झाल्याने गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 1 इंच पावसाची नोंद झली. पुढील 6 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही भागात मध्यम तथा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवारी पावसाने जोर धरला. गुरुवारी सांयकाळी अनेक भागात जोरदार पाऊस पडला. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. पुढील 24 तासांमध्ये गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक सव्वातीन इंच पाऊस वाळपईत पडला. केपे येथे 3 इंच, सांगे जवळपास 2 इंच, मडगाव 1 इंच, पेडणे, धारबांदोडा येथे प्रत्येकी 1 इंच पाऊस पडला. काणकोण व सांखळी येथे प्रत्येकी अर्धा इंच तर जुने गोवे व फोंडा येथे प्रत्येकी 1 से. मी. पावसाची नोंद झाली. दाबोळी, म्हापसा, मुरगाव व पणजी येथे नगण्य पाऊस पडला. गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 1 इंच नोंदी नंतर मौसमातील पाऊस आता 60 इंच झाला आहे. पुढील सहा दिवस म्हणजेच 24 जुलैपर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार असून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केले आहे.