जिल्ह्यात पावसाची ‘कोसळधार’
आर्द्राची जोरदार सलामी : सर्वत्र पाणीच पाणी, नदी-नाले प्रवाहित : शेती पाण्याखाली : जनजीवन गारठले
बेळगाव : सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. नदी, नाले तुडूंब भरून वाहत असून शेती पाण्याखाली गेली आहे. भात पिक पाण्याखाली गेल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर पावसाची कोसळधार सुरुच होती. त्यामुळे जनजीवन गारठले आहे.
आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाला सुरुवात झाली असून रविवार दि. 22 पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. बेळगावसह खानापूर, निपाणी, चिकोडी तालुक्यात या पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याने चिकोडी भागातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. सोमवारी सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तसेच भाजीपाला विक्रेत्यांना छत्री व रेनकोटचा आसरा घ्यावा लागला.
यंदा सुरुवातीपासूनच मे महिन्यात वळीव पावसाने झोडपून काढले. त्यानंतर लागलीच मान्सूनला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी घाईघाईने धूळवाफ पेरणी केली. पेरणीदरम्यान शेतकऱ्यांना मृग नक्षत्राने साथ दिली. पावसाने अधूनमधून उघडीप दिल्याने पेरणीची कामे शेतकऱ्यांनी कशीबशी उरकून घेतली. खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली असून भात रोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या रोपेची पेरणीदेखील पूर्ण करण्यात आली आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावर
बेळगाव शहर तालुका आणि जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची कोसळधार कायम असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनांना लहान मोठे अपघात घडत आहेत. पावसाची रिपरिप कायम असल्याने मंगळवारी बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे पहावयास मिळाले. त्याचबरोबर गवत गंजीवर प्लास्टिक घालण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची दुकानात गर्दी होत आहे. त्याचबरोबर रेनकोट, आणि छत्र्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.
पावसामुळे शेती पाण्याखाली गेल्याने पेरणी केलेले भात पीक कुजण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचेही नुकसान होत असल्याने भाजीच्या दरात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाल्याने सर्वांना चिंता लागून राहिली आहे. हवामान खात्यानेदेखील यंदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत वाढ
महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहणाऱ्या कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून चिकोडी भागातील सात बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत गेल्या आठ दिवसात सात फुटाने वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 23.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून यावर्षी सोमवारपर्यंत एकूण 889.2 पावसाची मि.मी. ची नोंद झाली आहे.
मार्कंडेय नदी पात्राबाहेर
बेळगाव तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेय नदीला मुसळधार पावसामुळे मंगळवारी पूर आला. नदी दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी पात्राबाहेर आल्याने परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यात मार्कंडेय नदीला पूर येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीचे पात्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जोयडा तालुक्यातील सर्व शाळांना आज सुटी
पावसाच्या जोरामुळे जोयडा तालुक्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून पावसाचा मारा दिवस-रात्र चालूच असल्याने नदी-नालेही भरून वाहत आहेत. तर जोयडा तालुक्यात अनेक ठिकाणी शाळकरी मुले खेड्यापाड्यातून येतात. यावेळी मुलांना शाळेत येणे धोक्याचे असल्याने जोयडा तहसीदारांनी बुधवार दि. 25 जून रोजी सर्व शाळा, कॉलेजना सुटी जाहीर केली आहे.