शहर परिसरात जोरदार पाऊस
नागरिकांची उडाली तारांबळ : बाजारपेठेवरही परिणाम
बेळगाव : गेल्या पाच-सहा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला असून विक्रेत्यांचीही गडबड झाली. शहर परिसर व उपनगरांतील काही ठिकाणी शुक्रवारी अचानक जोरदार पाऊस झाला. यामुळे वातावरणात थंडी होती. तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पिकांनाही पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
आठवडाभर पावसाने उसंत घेतली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला. नागरिक नेहमीप्रमाणे पाऊस नसल्याने सकाळपासूनच विना छत्री व रेनकोट बाहेर पडले होते. मात्र सायंकाळी 4.30 नंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांसह विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली. शेतकऱ्यांवर पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र पेरणीनंतर शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज होती. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पिकांनाही अनुकूल वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. पावसाचा काहीसा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे दिसून आले. आठवड्याभरात वातावरणात बदल झालेला दिसून आला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. परिणामी त्यांना पावसापासून बचावासाठी मिळेत त्या जागी आसरा घ्यावा लागला. नागरिक पावसापासून बचावासाठी छत्री व रेनकोट न घेता बाहेर पडले होते. पण सायंकाळी 4.30 नंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांना समस्येचा सामना करावा लागला. परिणामी त्यांना भिजत घरी जावे लागले. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.