सोलापुरात अतिवृष्टी, १०९ मिमी पाऊस पाच तासांत
सोलापूर :
बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंतच्या पाच तासांत सोलापूर शहरासह ग्रामीण भागात १०९ मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पाणी शिरले असून, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. काही घरांची भिंती कोसळल्या असून, झाडे उन्मळून पडली आहेत.
पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतजमिनीत पाणी साचले आहे. सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाजवळ व इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातील फूटपाथवर उभे असलेले एक मोठे पिंपळाचे झाड अचानक उन्मळून एका हॉटेलच्या छपरावर कोसळले. सुदैवाने हॉटेल त्या वेळी बंद असल्याने जीवितहानी टळली. मात्र, पत्रे, साइनबोर्ड आणि परिसरातील इतर संरचनांचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवार पेठेतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर आणि जय मल्हार चौकात राहणाऱ्या मंगलबाई अशोक रणदिवे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. घराची भिंत आणि छताचा काही भाग पडल्यामुळे कपाट, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले. हे कुटुंब सध्या उघड्यावर आले आहे.
वसंत विहार व बाळे परिसरातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची देखील मोठी तारांबळ उडाली आहे.