For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस

12:25 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस
Advertisement

नदी-नाल्यांनी ओलांडली धोक्याची पातळी : काहीकाळ गावांचा संपर्क तुटला 

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्मयात बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुऊवात झाली असून गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. तालुक्यातील सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्मयातील अनेक गावांचा संपर्क गुरुवारी सकाळी काहीवेळ खानापूरशी तुटलेला होता. तालुक्मयाच्या  ग्रामीण भागात आतापर्यंत 29 घरांची पडझड झाली आहे. त्यात 18 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी गोलीहळळी येथील पडझड झालेल्या घराची पाहणी केली.

गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने बुधवारी सकाळपासून जोर केला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात कणकुंबी येथे सर्वाधिक 125 मि. मी. पावसाची नेंद झाली आहे. तर लोंढा येथे 120 मि. मी. तर खानापुरात 50 मि. मी. पावसाची नेंद झाली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे तालुक्मयातील सर्वच नदी-नाले धोक्मयाच्या पातळीवरून वाहत आहेत. खानापूर येथील मलप्रभा नदीघाटावर पाणी आलेले आहे. सकाळी खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री नदीवरील पुलावर पाणी आल्याने या रस्त्याची वाहतूक तीन तास बंद झाली होती. त्यामुळे या भागातील लोक असोग्यावरून खानापूरला येत होते. तसेच लोंढा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने त्या भागातील पांढरी नदीसह इतर नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे लोंढा परिसरातील ग्रामीण भागातील पुलावर पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. यात सातनाळी, माचाळी परिसराला पाण्याने वेढले असून माचाळी नाल्यावर श्रमदानातून तयार करण्यात आलेला साकव पाण्याखाली गेल्याने लोंढ्याचा संपर्क तुटला आहे.

Advertisement

 29 घरांची पडझड 

पावसामुळे तालुक्यात ग्रामीण भागात घरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. आतापर्यंत एकूण 29 घरांची पडझड झाली असून त्यात 18 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री गोलिहळळी येथील शिवाप्पा निंगाप्पा कमतगी यांचे घर पूर्णपणे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याबाबतची माहिती खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना मिळताच त्यांनी गोलिहळळी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल तयार करण्याचा आदेश महसूल अधिकाऱ्यांना दिला आहे. आतापर्यंत पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीचा अहवाल तहसीलदार कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांकडून सादर केले आहेत. याबाबत पडताळणी करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे समजते.

झाडांच्या फांद्यांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा

पश्चिम भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीसह इतर उप नद्यांतून आणि नाल्यांतून मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या आणि झाडे वाहून येत आहेत. पुलांच्या ठिकाणी या झाडांच्या फांद्यांमुळे पाणी मोठ्या प्रमाणात अडले जात असल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने धोका निर्माण झाला आहे. मलप्रभा नदीवर जागोजागी ब्रिजकम बंधारे बांधल्याने या झाडांच्या फांद्यांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे.

लोंढा परिसरात जोरदार पाऊस,सातनाळी पुलावर पाणी : वाहतूक बंद 

लोंढा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने लोंढा परिसरातील माचाळी, सातनाळी, मांजरपै, घोसे, पिंपळे, पोटोळीसह इतर गावांचा संपर्क लेंढ्याशी तुटलेला होता.सकाळी सातनाळी पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या पुलावरील वाहतूक चार तास बंद होती. सकाळी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. काही पालकांनी आपल्या मुलांना उचलून घेऊन पाण्यातून मार्ग काढत लोंढा येथे शाळेला सोडले. मात्र काही विद्यार्थी शाळेला जावू शकले नाहीत.

लोंढा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतकी तरुण भारतशी बोलताना म्हणाले, सातनाळी-लोंढा या रस्त्यावरील नाल्यावर लहान पूल आहे. मोठा पाऊस झाल्यास या पुलावर पाणी येते. त्यामुळे माचाळी, सातनाळी, मांजरपै या गावांना बेटाचे स्वरुप प्राप्त होते. यासाठी हा लहान पूल काढून उंच पुलाची उभारणी करण्यात यावी, त्यामुळे पाण्याचा निचराही योग्य पद्धतीने होऊन या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी सोयीचे होणार आहे. यासाठी हे पूल तातडीने उंच करुन बांधण्यात यावे, गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत. मात्र याबाबत गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दरवर्षी मोठा पाऊस झाला तर या भागाला बेटाचे स्वरुप प्राप्त होते. आणि लोंढ्याशी संपर्क तुटतो. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी लोंढा भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतकी यांनी केली आहे.

खानापूर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना आज-उद्या सुटी 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना शुक्रवार 19 आणि शनिवार 20 जुलै रोजी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुटी जाहीर केली आहे. याबाबत खानापूर गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी गुऊवारी सायंकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधून तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाबाबत माहिती दिली होती. तसेच शाळांना सुटी जाहीर करण्याची विनंती केली होती.

Advertisement
Tags :

.