राकसकोप जलाशय काठोकाठ
दोन दरवाजे 2 इंचाने उघडल्याने मार्कंडेय नदीत विसर्ग : आता केवळ पावणे दोन फूट पाण्याची आवश्यकता
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात बुधवारी आणि गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने जलाशय काठोकाठ झाला असून बेळगाव शहराची पाण्याची समस्या आता दूर झाली आहे. गुरुवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2472.50 फूट इतकी झाली. पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळी सहा वाजता पाऊण फुटांनी पाणीपातळीत वाढ होऊन 2473.25 फूट झाली. पूर्ण क्षमतेने जलाशय भरण्याची आता केवळ पावणे दोन फूट पाण्याची आवश्यकता आहे.
जलाशयाकडे मिळणाऱ्या जांभूळ ओहळ नाला, मार्कंडेय नदीपात्र आणि लहान मोठे नाले आता दुथडी भरून वाहू लागले आहेत. जलाशय व्यवस्थापनाने सायंकाळी साडेपाच वाजता वेस्ट वेअरच्या सहा दरवाजांपैकी क्र. 2 व क्र. 5 हे दोन दरवाजे 2 इंचाने उघडण्यात आल्याने जलाशयातील पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीतून सुरू झाला आहे. गुरुवारी सकाळी जलाशय परिसरात 49.8 मि. मी. पावसाची नोंद झाली. यावर्षी एकूण पावसाची 1037.9 मि. मी. इतकी नोंद झाली. मागील वर्षी याच दिवशी एकूण 569.9 मि. मी. पाऊस झाला होता. तर पाण्याची पातळी 2453.25 फूट इतकीच होती.
जलाशय पाणलोट क्षेत्रातील परिसरात पावसाने जोर
जलाशय पाणलोट क्षेत्रातील परिसरात पावसाने जोर कायम ठेवल्याने जलाशयात पाणीपातळीत आठवडाभरात रोज फूटभराने वाढ झाली आहे. 2470 फुटानंतर 2475 फुटापर्यंतची पाणीपातळी ही विस्तारलेली असल्याने ती पाणीपातळी फूटभरच वाढली आहे. जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून 18 दिवसात 639 मि. मी. पाऊस झाल्याने 21 फूट पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जलाशयातील एकूण पाणीसाठा हा 27 फूटापर्यंत झाला आहे. मार्कंडेय नदीतून विसर्ग सुरू झाल्याने नदी काठावरील शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे.
नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जलाशयातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले आहे. मार्कंडेय नदी परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन शहर पाणीपुरवठा मंडळाने केले आहे. नदीकाठावर पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने कमी प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे.