For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापुरात शुक्रवारीही पावसाची जोरदार हजेरी

10:47 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापुरात शुक्रवारीही पावसाची जोरदार हजेरी
Advertisement

गुरुवारी 29 मि. मी. पावसाची नोंद, तर असोग्यात 57 मि. मी.

Advertisement

खानापूर : गेल्या चार दिवसांपासून खानापूर शहरासह तालुक्यात सायंकाळी जोरदार पाऊस होत आहे. शुक्रवारीही दुपारी 4 वाजता ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. एक तासभर झालेल्या पावसानंतर रात्री पावसाची रिपरिप सुरुच होती. गुरुवारी मध्यरात्री खानापूर शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शहरासह आसपासच्या परिसरातील नाले प्रवाहित झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मलप्रभेचे पात्र कोरडे पडलेले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या एक-दोन दिवसात मलप्रभा नदीपात्र प्रवाहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे हवेतील उष्णता बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. गुरुवारी खानापूर परिसरात 29 मि. मी. तर असोगा येथे 57 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी वळिवाने तालुक्यात उशीरा हजेरी लावली. मे महिन्याच्या मध्यानंतर वळिवाने खानापूर तालुक्यात हजेरी लावली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या हंगामाची मशागतीची कामे सुरू केली होती. तसेच पेरणीचा हंगामही साधला होता. मात्र गेल्या चार दिवसापासून शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे शेतवडीत मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.

शेतवडीत पाणी साचल्याने पेरणी खोळंबली

Advertisement

तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात भातपेरणी केली जाते. तर पश्चिम भागात नट्टी लावून भात उत्पादन घेतले जाते. सध्याचा पाऊस हा भात नट्टीसाठी पोषक आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हंगाम मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जर भविष्यात पावसाने अशीच साथ दिल्यास खरीप पेरणीची आणि नट्टी लावणे, पेरणीनंतरच्या मशागतीच्या कामास मदत होणार आहे.

जोरदार पावसामुळे नाले प्रवाहित

गेल्यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने तालुक्यातील सर्व नदी-नाले कोरडे पडले होते. गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे नाले पूर्णपणे प्रवाहित झाले असून या सर्व नाल्यांचे पाणी मलप्रभेत मिसळणार आहे. कणकुंबी, जांबोटी परिसरात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्यास मलप्रभेचे नदीपात्र प्रवाहित होणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून मलप्रभेचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने पाण्याचाही प्रश्नही गंभीर बनला होता. सर्वांच्या नजरा पावसासाठी आकाशाकडे लागल्या होत्या. यावर्षीही वळिवाने उशीरा सुरुवात केली असली तरी गेल्या चार दिवसापासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. असाच पाऊस पडल्यास तालुक्यातील सर्व नदी-नाले प्रवाहित होतील.

Advertisement
Tags :

.