गोव्यात जोरदार पाऊस,26 पर्यंत यलो अलर्ट जारी
पणजी : गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस चालूच आहे. अधूनमधून पडणाऱ्या या पावसामुळे जनता त्रस्त झालेली आहे. येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मौसमी पावसाने माघार घेऊन जवळपास दोन आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे, मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेईना. दिवाळीच्या पूर्वदिनापासून गोव्यात पावसाने बराच जोर धरलेला आहे. गेल्या 24 तासात गोव्यात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र जोरदार पाऊस पडून गेला. सर्वाधिक पावसाची नोंद पणजी येथे पावणे दोन इंच झाली. सांखळीत एक सेंटिमीटर, पेडणे, मुरगाव, म्हापसा, जुने गोवे, सांगे, फोंडा, काणकोण या ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात सरासरी राज्यात सहा पूर्णांक पाच मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली. मान्सूनोत्तर पावसाची नोंद आतापर्यंत साडेपाच इंच झाली आहे. सध्या ‘ऑक्टोबर हिट’ चालू असून याच दरम्यान जोरदार पाऊस अधूनमधून पडत आहे. हा पाऊस मेघगर्जनेसह पडत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होत असून ते गोव्यापासून अद्याप 910 किलोमीटर दूर आहे. मात्र त्या दिशेने ते पुढे सरकत आहे. पुढील चार दिवसात सर्वत्र मध्यम तथा काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.