आजपासून गोव्यात जोरदार पाऊस
पणजी : अरबी समुद्रात कर्नाटकापासून दूरवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून परिणामी गोव्यात 20 ते 23 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नारंगी अलर्ट जारी केला असून आजपासून गोव्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. गोव्यात गेले चार दिवस ढगाळ हवामान असून विविध भागात मध्यम तथा हलक्मया प्रमाणात पाऊस पडून गेला आहे. पणजीत रविवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. सध्या पावसाला जोर नाही, मात्र आज पावसाचा जोर सर्वत्र वाढेल असा अंदाज आहे. कर्नाटकापासून दूर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून कदाचित त्याचे चक्रीवादळातही रूपांतर होऊ शकते. संभाव्य चक्रीवादळाची दिशा उत्तरेकडे असून ते गुजरातकडे सरकण्याची शक्मयता आहे. मात्र त्यादरम्यान गोव्यात सर्वत्र गडगडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मान्सून अंदमानात सक्रिय
सध्या मान्सून अंदमानात सक्रिय झाला आहे. तिथून तो केरळच्या दिशेने सरकत आहे. साधारणत: दरवषी पाच जून हा गोव्यासाठी मान्सूनच्या आगमनाचा दिवस गृहीत धरला जातो. काहीवेळा मान्सून लवकरही येतो व काहीवेळा तो थोड्या उशिराने पोचतो. यंदा मान्सूनसाठी पूरक असे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे नियमित कालावधीच्या अगोदरच तो येऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रविवारी सकाळी गोव्याच्या अनेक भागात हलक्मया स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी काही भागात मध्यम स्वरूपाचा तर सायंकाळी पणजीत जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार सांगे, केपे, काणकोण, मडगावमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता.
दरम्यान गेल्या 24 तासात कमाल तापमान 33.5 डिग्री एवढे होते म्हणजेच तापमान थोडे खाली उतरले आहे. साखळीमध्ये दहा पूर्णांक चार मिलिमीटर, मुरगावात दहा पूर्णांक दोन मिलिमीटर, सांगेमध्ये नऊ पूर्णांक तीन मिलिमीटर तर जुने गोवेमध्ये आठ पूर्णांक दोन मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. दाबोळी, म्हापसा, धारबांदोडा, पणजी जुने गोवे या ठिकाणी अल्पशा प्रमाणातील पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यात सतत पाऊस पडत राहणार असून 20 ते 22 अशा तीन दिवसात मुसळधार पावसात हवामान खात्याने नारंगी अलर्ट जारी केला आहे तर त्यानंतर पुढील दोन दिवस हलक्मया तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्मयता व्यक्त केली आहे.