कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News: कोबी घ्या फुकट, त्यावर फ्लॉवर मोफत, हतबल शेतकऱ्यांची मूक वेदना

02:04 PM Sep 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकऱ्याच्या शेतात लावलेली कोबी आणि फ्लॉवर या दोन्ही पिकांना कीड लागलीये

Advertisement

By : आप्पासाहेब रेपे

Advertisement

सावर्डे बुद्रुक : कोबी घ्या फुकट, त्यावर फ्लॉवर मोफत’, बाजारात ऐकू येणारा हा आवाज कुणालाही थांबून पाहायला भाग पाडत होता. एका वयस्कर शेतकऱ्याच्या ओठातून निघणारी ही आरोळी, त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली विवंचना, हे सारे पाहून बाजारातील सर्वजण स्तब्ध झाले होते.

ही घटना कागल तालुक्यातील केनवडे भाजी बाजारात घडली. शेतकरी मारूती पोवार यांचे सततच्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या शेतात लावलेली कोबी आणि फ्लॉवर या दोन्ही पिकांना कीड लागली. विक्री योग्य अवस्थेत असले तरी या भाजीपाल्याचा रंग, पोत आणि आकर्षण नष्ट झाल्याने व्यापाऱ्यांनी माल घ्यायला नकार दिला.

परिणामी, हताश झालेल्या या शेतकऱ्याने कोणताही मोबदला न घेता तो माल मोफत वाटायचा निर्णय घेतला. “घ्याल का? नाही घेतलं तरी चालेल. पण कुणी तरी खा... माझ्या घामाचा काही उपयोग तरी होईल,“ असे तो शेजारी उभ्या असलेल्या ग्राहकाला म्हणताना दिसत होता. ही दृश्य मन हेलावून टाकणारी होती. शेतकऱ्याचे डोळे पाणावलेले होते, आवाज भरून आलेला, आणि चेहऱ्यावर फक्त एकच भाव... हातबलता.

या शेतकऱ्याचे म्हणणे होते, “घर चालवायचं आहे, मुलांना शिकवायचं आहे म्हणून हे पीक घेतलं. पण आता ना पैसे मिळाले, ना माल विकला जातोय. हे शिल्लक ठेवून काय उपयोग? किमान कुणाच्या तोंडात तरी जावं, म्हणून वाटतोय. शेतकरी वर्गाला नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका बसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

विमा योजनेची अंमलबजावणी, हमीभावांची अस्थिरता, बाजारपेठेतील दलाली, या सर्वांनी मिळून शेतकऱ्याची कोंडी केली आहे. सरकारच्या विविध योजना केवळ कागदावर राहिल्या, तर अशा घटनांचे प्रमाण वाढत राहील, हे निश्चित. हा प्रसंग केवळ एका शेतकऱ्याची वेदना नाही, तर संपूर्ण कृषीव्यवस्थेतील त्रुटींचं प्रतिक आहे.

प्रशासन, समाज आणि ग्राहक वर्गाने या हाकेला उत्तर देण्याची ही वेळ आहे अन्यथा उद्याचा अन्नदाता अन्नासाठीच मोफत भाजी वाटताना दिसेल.

अंधकारमय जीवन

शेतकरी हा खरा अन्नदाता आहे. तो आपल्या कष्टाने मातीतून सोनं निर्माण करतो. रक्ताचं पाणी करून तो दिवस-रात्र राबतो, पण त्याचे जीवन मात्र अंधारात गेले आहे. मागील दोन वर्षे बाजारभावाच्या अनिश्चिततेने त्याला झळा सोसाव्या लागल्या.

हे तिसरे वर्षही त्याच्यासाठी तितकेच संकटमय ठरणार आहे. कारण यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही चालूच आहे. त्यामुळे उसासहित सर्वच पिके गारठून गेलेली आहेत. पिकांची वाढच थांबलेली असून बहुसंख्य किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#agricultural#heavy rainfall#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaagri newsmarket ratevegetable market
Next Article