कारवार किनारपट्टीवर धुवाधार पाऊस सुरूच
सात तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कोसळणाऱ्या धुवांधार पावसामुळे किनारपट्टीवासियांची त्रिधातिरपीट उडाली आहे. 11 तारखेपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यांच्याबरोबरीने मलनाड प्रदेशातील शिरसी, यल्लापूर आणि सिद्धापूर तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सात तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी सुटी जाहीर केली आहे. सिद्धापूर तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे होन्नावर तालुक्यातून वाहणाऱ्या गुडबाळ नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील अनेक घरे जलमय झाली आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शिरसी, कुमठा रस्त्यावरील देवीमने घाटात दरड कोसळली आहे. तरी या रस्त्यावरील वाहतुकीवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत बंदी घातली आहे. वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी देवीमने घाटात पोलीस तैनात केले आहेत.
ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांनी दिली भेट
जिऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांनी देवीमने घाटाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकरचे प्रोजेक्ट डायरेक्टर, कुमठाचे तहशीलदार व सिनीयर पोलीस अधिकारी उपस्थित होते. कोसळलेल्या दरडींना हात न लावण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला. दरडींना हात लावल्यास पुन्हा दरडी कोसळतील, असा इशारा दिला.