For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच

11:39 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच
Advertisement

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत : कारवार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुटी

Advertisement

प्रतिनिधी / कारवार

जिल्ह्यात पावसाचा मारा सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाने रेडअलर्ट जारी केले असले तरी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हावासिय हैराण झाले आहेत. या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत  झाले असून मागील काही वर्षांपासून असा पाऊस झाला नसल्याची अनुभुती नागरिकांना आली आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Advertisement

कारवार तालुक्यातील दक्षिण भागातील चंडीया, अरगप आदी प्रदेश पुन्हा एकदा जलमय झाला. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सीबर्ड प्रकल्पाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर आंदू, तहलसीदार एन. नरोन्हा यांनी परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. शिवाय चंडीया, अरगा भागामध्ये कोणत्या कारणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे, याबद्दलची कारणे जाणून घेतली.

यावेळी नागरिकांनी येथील समस्या सांगताना समन्वयाचा अभाव याची माहिती दिली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या समितीमध्ये असिस्टंट कमिशनर, एनडीआरएफ, अग्निशमन, पोलीस खाते, स्थानिक ग्राम पंचायती आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असतील.

माजी आमदारांची भेट 

चंडीया परिसर पुन्हा एकदा पावसाच्या पाण्यामुळे बुडाल्याची माहिती मिळताच कारवारच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्ष रुपाली नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सीबर्ड प्रकल्पाचे अधिकारी व पोलीस उपस्थित होते. यावेळी रुपाली नाईक यांनी नागरिकांच्या या समस्येकडे साफ दुल केले आहे. आपण प्रकल्पाच्या विरोधात नाही. स्थानिकांच्या त्यागातूनच हा प्रकल्प उभारला जात आहे. मग आम्ही जनतेला न्याय मिळवून देण्यात का कमी पडत आहोत? याचा विचार करायला नको का असा प्रश्न उपस्थित केला.

पुन्हा दरड कोसळली

सोमवारी होन्नावर-सागर-बेंगळूर रस्त्यावरील खर्वा फाट्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. कारवार-यल्लापूर, इलकल मार्गावरील शिरवाड, कारवार रेल्वे स्थानकापासून दीड कि.मी. अंतरावरील मद्रोळी येथे दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. हब्बुवाडा प्रदेशातील फीशरीज कॉलनीतील माजी सैनिक विनोद उळवेकर यांच्या घरावर दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

24 तासांत 870 मि.मी.ची नोंद

मागील 24 तासांत 870 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 77.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 5 जनावरे दगावली आहेत. शिवाय दोन घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 18 घरांची पडझड झाली. मागील 24 तासांत 40 नागरिकांचे (35 होन्नावर आणि पाच कुमठा) नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी जिल्ह्यातील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, शिरसी, सिध्दापूर, यल्लापूर, सुपा आणि दांडेली तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवार दि. 16 रोजी सुटी जाहीर केली आहे.

आणखी तीन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट

कारवार जिल्ह्यात पुन्हा रेडअलर्ट वाढविण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. 18 जुलैपर्यंत रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी दिली. शिवाय कारवार ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कारवार इलकल रस्त्यावरील मंद्रोळी येथे दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करुन सदाशिवगड-कड्रामार्गे वळविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.