कारवार जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच
पुढील काही दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट : काळी नदी काठावरील काही खेड्यांना पुराचा धोका
प्रतिनिधी/ कारवार
कारवार जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. परिणामी जिल्ह्याची संपूर्ण किनारपट्टी जलमय झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. किनारपट्टीवर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे अरबी समुद्र खवळला असून समुद्रातील खराब वातावरणामुळे सांप्रदायिक मासेमारीसह यांत्रिक होडीद्वारे करण्यात येणारा मत्स्यव्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मच्छीमारी बांधवांना मासेमारीच्या ऐन हंगामात यांत्रिक होड्या मासेमारी बंदरात नांगरण्याची वेळ आली आहे.
किनारपट्टीवरील उत्तर भागातील काळी नदीवरील कद्रा जलाशयाचे दरवाजे उघडल्याने काळी नदीच्या काठावरील कारवार तालुक्यातील काही खेड्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
तर किनारपट्टीच्या दक्षिण भागातील शरावती नदीवरील लिंगनमक्की जलाशयाचे 11 दरवाजे उघडल्याने शरावती नदीच्या काठावरील होन्नावर तालुक्यातील काही खेड्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. काळी आणि शरावती नद्यांच्यामधील भागातील गंगावळी आणि अद्यनाशिनी या प्रमुख नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. अद्याप तरी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.
कद्रा धरणातून 51 हजार क्युसेकचा विसर्ग
काळी नदीवरील कद्रा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे काळी नदीच्या पात्रात 51 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. या धरणात 28 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. लिंगनमक्की जलाशयाचे 11 दरवाजे उघडून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. होन्नावर तालुक्यातील 160 कुटुंबाना सुरक्षितस्थळी खबरदारीचा उपाय म्हणून हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात 24 तासांत एकूण 720 मि.मी. पावसाची नोंद
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 720 मि.मी. आणि सरासरी 60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची नोंद अशी (आकडेवारी मि.मी. मध्ये) - अंकोला 55, भटकळ 69, हल्ल्याळ 54, होन्नावर 56, कारवार 75, कुमठा 70, मुंदगोड 18, सिद्धापूर 61, शिरसी 48, सुपा 91, यल्लापूर 40, दांडेली 69.
मुसळधार पाऊस आणि अरबी समुद्रातील खराब वातावरणामुळे मच्छीमारी बांधवाना इशारा देऊनही पारंपरिक होडीद्वारे मासेमारीसाठी अरबी समुद्रात उतरलेले सहा मच्छीमारी बांधव होडी उलटल्याने अडचणीत आले होते. तथापि अन्य मच्छीमारी बांधवांनी घटनास्थळी धाव घेऊन अडचणीत आलेल्या त्या मच्छीमारी बांधवाना सुखरुपपणे वाचविले. ही घटना मंगळवारी येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर अरबी समुद्रात घडली. मच्छीमारी बांधव वाचले. तथापि होडी बुडून लाखो रुपयांची हानी झाली.
कद्रा-कैगा रस्त्यावरील पूल पाण्याखाली
काळी नदीवरील कद्रा जलाशयातून 51 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग काळीनदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे कद्रा धरणाच्या खालील बाजूस असलेला कद्रा-कैगा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन अन्यत्र मार्गाने वळविण्यात आली आहे.
आजही शाळा, महाविद्यालयांना सुटी
जोरदार पावसामुळे कारवार जिल्ह्याची संपूर्ण किनारपट्टी जलमय बनून राहिली आहे. तसेच पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीसाठी शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर, जोयडा, दांडेली आणि मुंदगोड या तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांना बुधवार दि. 20 रोजी सुटी जहीर करण्यात आली आहे.