एक दगड उचलला तरी मोठा दंड
पर्यटकांसाठी कठोर इशारा
सागर किनाऱ्यावर तुम्ही जेव्हा फिरायला जाता तेव्हा तेथून वाळू, दगड प्रत्येक जण उचलून घेत असतो. अनेक लोक हे दगड समुद्रात फेकतात, लाटांचा आनंद घेतात. परंतु एका बेटावर तुम्ही एक जरी दगड उचलला तरीही 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागतो. तेथे पर्यटकांसाठी कठोर इशारा जारी करण्यात आला आहे. चुकून कुणी असे केले तर तो मोठ्या अडचणीत सापडलो.
कॅनेरी आयलँडमध्ये लॅनजारोट आणि फ्यूरटेवेंटुरा येथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा इशारा जारी करण्यात आला आहे. येथे दरवर्षी उन्हाळ्यात हजारेंच्या संख्येत पर्यटक येत असतात. येथे हे पर्यटक अनेक दिवस वास्तव्य करतात. परंतु येथून जाताना ते आठवण म्हणून येथील दगड उचलून नेतात. काही लोक या किनाऱ्यावरील वाळूही नेतात. यामुळे बेटावर आता दगडांचे प्रमाण कमी झाले असून किनाऱ्याच्या सौंदर्यावर प्रभाव पडू लागला आहे. पर्यटकांची स्मृतिचिन्ह जमविण्याची ही सवय बेटाच्या पर्यावरणावर अत्यंत खराब प्रभाव पाडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
लॅनजारोट बेटाच्या समुद्र किनाऱ्यावरुन जवळपास एक टन ज्वालामुखीय सामग्री दरवर्षी पर्यटक उचलून नेतात. अशाचप्रकारे फ्यूरटेवेंटुराच्या प्रसिद्ध ‘पॉपकॉर्न बीच’वरून दर महिन्याला एक टन वाळू पर्यटक स्वत:सोबत नेत असतात. अनेकदा माती, दगड अणि दगड जप्त करण्यात आले, परंतु पर्यटकांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या कठोर भूमिकेचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जर कुणी समुद्र किनाऱ्यांवरून दगड आणि वाळू नेण्याचा प्रयत्न करताना आढळून आल्यास त्याच्यावर 13,478 रुपयांपासून 2.69 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.