महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जड झाले ओझे

06:36 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घर, शाळा आणि शिकवणीचे वर्ग या दरम्यान पाठीवर प्रचंड मोठी ‘स्कूल बॅग’ (पूर्वीचं दप्तर) घेऊन ये जा करणारी मुलं बघितली की अनेकांना, ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ ही मराठीतील सुप्रसिद्ध गाण्याची ओळ आठवते. पाटीवरच्या दप्तराच्या ओझ्याने वाकलेली मुलं पाहून कीव येते. शिक्षणतज्ञ, मानसोपचारतज्ञ, डॉक्टर सर्वजण या ओझ्याबद्दल नाराजी व्यक्त करत असतात.

Advertisement

Advertisement

केंद्रीय शिक्षणखात्याने हे दप्तराचं वजन विविध वयोगटासाठी किती असावं यासंबंधी मार्गदर्शक सूचनादेखील केल्या आहेत. सामान्यपणे पहिली आणि दुसरीसाठी दीड किलो, तिसरी ते पाचवी दोन ते तीन किलो, सहावी-सातवीसाठी चार किलो, आठवी व नववीसाठी साडेचार किलो तर दहावीच्या मुलांसाठी पाच किलो वजन असायला हरकत नाही. पण प्रत्यक्ष चित्र वेगळंच दिसतं. आपल्या वयापेक्षाही जास्त ओझं विद्यार्थी वाहत असतात. प्रोफेसर यशपालांनी तर अनेक शाळांच्या दारापाशी हातात वजनमापक यंत्र घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती.

ग्रामीण भागात हे ओझं घेऊन मुलांना चालावं लागतं तर शहरी भागात शाळांच्या बहुमजली इमारती असल्यामुळे हे ओझं सांभाळत दोन-तीन मजले चढावे लागतात. मुलांच्या सर्व अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसते आणि अशाच अवस्थेत त्यांना दप्तरांचं ओझं वहावं लागत असल्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर ताण पडून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मुलांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, खांदेदुखीच्या तक्रारी वाढत असल्याचे अनेक

डॉक्टरांचे निरीक्षण आहे. काही वेळा तर पुस्तकांच्या वजनापेक्षा दप्तरांचंच वजन अधिक असल्याचं लक्षात येतं. हे वजन कमी करण्यासाठी काही शाळा वेगवेगळे प्रयोग करत आहेत. थोडी फार जागृतीही निर्माण होत आहे. पण या समस्येच्या तुलनेने प्रयत्न व प्रयोग फारच तूटपुंजे आणि तुरळक आहेत. हे ओझं शारीरिक स्वरुपाचं असल्यामुळे या संबंधी निदान लिहिलं, बोललं तरी जातं.

पण या पाठीवरच्या ओझ्याव्यतिरिक्त मुलांच्या तनामनावर अन्य कितीतरी प्रकारची ओझी असतात. ती सर्वांनाच दिसत नाहीत, जाणवत नाहीत. त्यामुळे त्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. पण प्रत्यक्षात दप्तराच्या वजनापेक्षा ही न दिसणारी, जाणवत नसलेली ओझी अधिक अपायकारक आहेत.

पालकांच्या अपेक्षांचं ओझं हे सर्वाधिक असतं. त्या ओझ्यामुळे कधीही न भरून येणारं असं नुकसान होतं. ‘आई बाबा, मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.  मला माफ करा,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत या जगाचा निरोप घेणारी मुलं थोडी थोडकी नाहीत. राजस्थानातील कोटा हे शहर शैक्षणिक हब म्हणून जेवढं प्रसिद्ध आहे त्याहीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी सव्वीस विद्यार्थ्यांनी या एका शहरात आत्महत्या केल्याचं वृत्त होतं.

आपल्या मुलाची कुवत, आवड-निवड लक्षात न घेता पालक मुलांकडून भरमसाठ अपेक्षा ठेवतात. गंमत म्हणजे चारचौघात बोलत असताना, ‘आमच्या मुलाने अमुकच व्हावं अशी आमची अपेक्षा नाही. आम्ही मुलांना स्वातंत्र्य दिलं आहे,’ असं सांगायला विसरत नाहीत. पण मनात खोल कुठेतरी अपेक्षांचा कोंब लवलवत असतोच.

आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच मुलांचा जन्म झालेला नाही. त्यांची स्वत:ची स्वप्नं असतात. ती त्यांना पाहू द्या आणि जगू द्या. आईवडिलांचं कार्य पुढे चालवणारी मुलंही असतात. पण ते सक्तीने थोपून नव्हे. स्वयंविचाराने, स्वयंप्रेरणेने एखाद्याने ते केलं तर उत्तमच. पण ते दुसऱ्याचं ओझं आपण वाहत आहोत या भावनेने नसावं.

आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात वेळेचंही एक ओझं मुलांना सांभाळावं लागतं. शालेय वेळाव्यतिरिक्त विविध प्रकारच्या, विषयांच्या शिकवण्यांची वेळही सांभाळावी लागते. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचे शाळेत जादा वर्ग असतातच. त्याशिवाय खाजगी शिकवणीचे वर्गही असतात. अनेक शहरांत शाळेत सकाळी जायच्या अगोदर सहा वाजता अशा वर्गांना जाणारी मुलं दिसतात. शाळा सुटल्याबरोबर परत आणखी कसला तरी वर्ग असतो. या सर्व वेळा सांभाळता सांभाळता मुलं मेटाकुटीला येतात. एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे सारखी धावाधाव असते.

हे सर्व कमी पडतं म्हणून विविध छंदवर्गांचा ससेमिराही पाठी लागलेला असतो. दिवसभर कसरत चाललेली असते. इथंच सारं संपत नाही. मुलांना हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. अमुक विषयाची किमान तोंडओळख हवी, तमुक विषय प्राथमिक स्वरुपात तरी माहीत असायला हवा, अशा अनेक सूचना सर्व बाजूंनी येत असतात. त्यांचा अंतर्भाव व्हावा असा आग्रह धरला जातो.

सर्वच शाळा सर्व मुलांना सुरक्षित, भयमुक्त वाटत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. काही मुलांना काही शिक्षकांचीही भीती वाटते. वर्गात काही थोराड, दांडगट आणि दणकट मुलंही असतात. त्यांची दादागिरी चाललेली असते. शारीरिकदृष्ट्या काहीशा कमजोर, दुर्बल मुलांच्या मनावर याचाही ताण असतो. मुलींच्या मनावर तर वेगळे ताणतणाव असतात. सुसज्ज स्वच्छतागृहे मुलींसाठी हवीत. त्यांच्या विविध समस्या असतात आणि अशा व्यवस्था नसतील तर स्वाभाविकपणे मनावर दडपण वाढतं. हल्ली मुलांमध्ये आर्थिक स्तरामुळेही अहंगंड, न्यूनगंड निर्माण होताना दिसतो. आर्थिक स्तरानुसार मुलांचे मित्रगट बनत असतात. शाळेत सोडायला येणाऱ्या गाड्यांच्या किमती आणि मॉडेल यांचाही परिणाम होतो, असं लक्षात आलं आहे.

वडिलांची व्यसनाधिनता, आईवडिलांमधला संघर्ष, घटस्फोट अशा अनेक गोष्टींबद्दल मुलांना इतरांशी बोलता येत नाही. ती आतल्या आत कुढत राहतात. भावना कोंडून राहतात. प्रचंड अस्वस्थता, तगमग होत राहते. कोवळ्या वयात हे सगळं सहन करावं लागतं. सर्वांनाच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही.

पौगंडावस्था तर वादळावस्थाच असते. शरीर रचनेमध्ये बदल होत जातात. मनही दोलायमान होतं. नवी आकर्षणं निर्माण होतात. घरात, शाळेत असूनही एकाकीपणाची भावना उसळून येते. अशीही अनेक न दिसणारी वादळं, ओझी, ताणतणाव, या सर्वांतून सुखरूप सहीसलामत बाहेर पडायला हवं. या सर्वांवर मात करायला हवी. यापासून दूर पळून न जाता सामोरं जाण्यासाठी परत उभारी घ्यायला हवी. सर्वच ओझी फेकून देता येत नाहीत. कौशल्याने हलकी करावी लागतात. दोघेजण देवाला प्रार्थना करत असतात. पहिला म्हणतो, ‘देवा मला कोणतीच संकटं, आव्हानं, अडचणी देऊ नकोस. माझी वाट पूर्णपणे निर्विघ्न असू दे.’ दुसरा प्रार्थना करतो, ‘ईश्वरा तू मला वाट्टेल तेवढे कष्ट दे, कठीण कामं दे. पण त्याचबरोबर हे सर्व पेलण्यासाठी मजबूत खांदे दे. तुझ्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने मी सहज सगळ्या अडचणी पार करेन.’ ही दुसऱ्या प्रकारची प्रार्थना मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही हवी.

- दिलीप वसंत बेतकेकर

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article