युक्रेनच्या राजधानीवर रशियाकडून जोरदार हवाई हल्ले
अनेक इमारतींना लागली आग
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची चिन्हे अद्याप दिसून येत आहेत. कीव्हच्या लवीव भागात शुक्रवारी पहाटे रशियाकडून हवाई हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे झालेल्या स्फोटात नागरी इमारती आणि गोदामांना आग लागली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. रशियाच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी मेट्रोस्थानकाच्या इमारतीचा वापर केला जात होता, रशियाच्या हवाई हल्ल्यात या इमारतीचे देखील नुकसान झाल्याची माहिती कीव्ह शहराच्या सैन्य प्रशासनाने दिली आहे.
रशियाकडून हवाई हल्ले करण्यात आल्याने हवाई सुरक्षा प्रणालींना सक्रीय करण्यात आल्याचे कीव्हच्या महापौरांनी सांगितले आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात खारकीव्हमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून सुमारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे औद्योगिक प्रकल्पांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती खारकीव्हच्या महापौरांनी दिली आहे. युक्रेनकडून करण्यात येणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रमाण वाढविले आहे.