देशभरात उष्माघाताचा वाढणार प्रकोप
कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये उष्माघातामुळे भारतात जवळपास 700 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. यावर्षी या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, यंदा फेब्रुवारी, मार्चमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये लवकर उष्णता देशभरात वाढलेली दिसून आली आहे. रात्रीच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली असून तापमानात 1 ते 3 डिग्री सेल्सियस इतकी वाढ नोंदली गेली आहे. ही बाब पाहता येणारा काळ हा वाढत्या उष्णतेचा प्रकोप पाहता कठीण असणार आहे, हे नक्की. अशावेळी सामान्यांनी बेफीकीर राहून चालणार नाही. प्रखर उन्हात जाण्याचे टाळण्यासोबतच पाण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे.
यंदा 15 मार्च रोजी ओडिसा आणि झारखंड या राज्यांमध्ये सर्वाधिक उष्णता रात्रीच्या वेळेला नोंद केली गेली आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत माहिती दिली असून मागच्या वर्षी 27 मार्च रोजी पहिल्यांदा गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान वाढल्याची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेमध्ये पाहता यंदा मार्चमध्ये लवकर उष्णतेने आपला प्रकोप सर्वदूर पसरायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी हा महिनासुद्धा उष्णतेच्या बाबतीमध्ये विक्रम नोंदवू लागला आहे. उष्माघाताच्या घटना फेब्रुवारीतही दिसून आल्या आहेत. यंदाचा विचार करता 25 फेब्रुवारी रोजी गोवा आणि महाराष्ट्रामध्ये देशातील पहिल्या उष्ण हवामानाची नोंद करण्यात आली. जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचा हंगाम हा हिवाळी हंगाम म्हणून नोंदला जातो. याच हंगामामध्ये वातावरणातील उष्णता अधिक प्रमाणात वाढल्याने हिवाळा या ऋतुवर त्याचा परिणाम पहायला मिळतो आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 हा महिना गेल्या 125 वर्षांमध्ये पाहता सर्वाधिक उष्ण राहिला असल्याचे म्हटले आहे.
15 मार्च रोजी ओडिसामध्ये बौध येथे सर्वाधिक 43 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले आहे. झारसुगुडा आणि गोलनगिर या ठिकाणीही तापमान अनुक्रमे 42 डिग्री सेल्सियस, 41 डिग्री सेल्सियस इतके उच्च नोंदवण्यात आले. देशातील ही तीन ठिकाणे सर्वाधिक उष्णतेची पहायला मिळाली. फेब्रुवारी 2025 मध्ये रात्रीचे तापमान हे सरासरी सामान्यपेक्षा अधिक वाढलेले दिसून आले होते. 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान 31 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रात्रीचे तापमान सामान्य तापमानापेक्षा 1 डिग्री सेल्सियस अधिक वाढलेले पहायला मिळाले तर यापैकी 22 राज्यांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये रात्रीच्या तापमानामध्ये सरासरी तापमानापेक्षा 3 ते 5 डिग्री सेल्सियस इतकी वाढ नोंदली गेली आहे.
एखाद्या ठिकाणी किंवा शहरामध्ये नेहमीपेक्षा अधिक उष्णता हवामानामध्ये दिसून आली की, उष्माघाताच्या घटना समोर येतात. सरासरी तापमानापेक्षा काही डिग्री सेल्सियस तापमान वाढल्यास उष्णतेच्या लाटा येतात. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार 40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा अधिक तापमान नोंद केले गेल्यास तेथे उष्णतेची लाट आली आहे, असे गृहित धरले जाते. या उष्णतेच्या नोंदीसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा आधार हवामान खात्याला घ्यावा लागतो. यामध्ये तापमान, हवेतील आर्द्रता, दबाव, वाऱ्याचा वेग आणि दिशा यासारख्या गोष्टी हवामान खात्याकडून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अभ्यासल्या जातात. संबंधित शहरातील हवामान केंद्राच्या माध्यमातून भारतीय हवामान खात्याकडे तापमानाची माहिती पाठविली जात असते. भारतीय हवामान खाते त्यानंतर आपली कार्यवाही पार पाडत असते. 13 ते 17 मार्च दरम्यान ओडिशात, 14 ते 17 मार्च दरम्यान झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटा यंदा दिसून आल्या. 21 मार्चपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात राजस्थान, ओडिसा आणि उत्तर गुजरातमध्ये काही ठिकाणी हवामान अधिक उष्ण राहू शकते, असेही हवामान खात्याने नोंदवले आहे. छत्तीसगड, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्येही उष्णता आगामी काळामध्ये अधिक राहणार असल्याचाही इशारा हवामान खात्याने दिला असून लोकांनी दुपारच्या सत्रामध्ये घरीच राहण्याचा सल्लाही दिला आहे.
सध्याला पुण्यामध्ये 38 डिग्री सेल्सियस, हैद्राबाद 37 डिग्री सेल्सियस, कलबुर्गी 40 डिग्री सेल्सियस, विजापूर आणि बिदर येथे 38 डिग्री सेल्सियस इतके अधिक तापमान पहायला मिळते आहे. मागच्या वर्षी भीषण उष्णतेमुळे जवळपास 700 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. यावर्षी या संख्येमध्ये वाढीची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक हवामान बदलाच्या कारणास्तव भारतातच नव्हे तर इतर देशातही गेल्या काही वर्षांमध्ये सरासरी तापमानामध्ये वाढ झालेली पहायला मिळाली आहे. कोणत्याही हंगामामध्ये गरमीचा अनुभव भारतातच नाही तर इतर देशातही लोकांनी घेतलेला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, किंग्ज
कॉलेज लंडन, प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी
ऑफ कॅलिफोर्निया यासारख्या संस्थांनी भारतातील वाढत्या तापमानाचा अभ्यास केला असून येणाऱ्या काळामध्ये विविध शहरांमध्ये उष्णता अधिक वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्याला वाढत्या तापमानात प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी स्वत: घ्यायची आहे. आहार हलका घेण्यासोबत पाणी जास्तीत जास्त घ्यायला हवे. लिंबू सरबतसारखी पेये घ्यायला हरकत नाही. फ्रीजमधील थंडगार पाणी पिणे टाळावे. माठातले पाणी घ्यायला हरकत नाही. उन्हात जाणार असाल तर डोक्यावर छत्री किंवा टोपी आवश्य घालावी.
दीपक कश्यप