For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उष्णता, वीजसंकटाने चीन बेहाल

07:00 AM Aug 26, 2022 IST | Tarun Bharat Portal
उष्णता  वीजसंकटाने चीन बेहाल
Advertisement

शॉपिंग मॉलवर बंदी : कारखान्यांना टाळे, विजेअभावी काळोखा बुडाली अनेक शहरे

Advertisement

वृत्तसंस्था / बीजिंग

चीनमध्ये 61 वर्षांमधील सर्वात अधिक उष्णता आणि दुष्काळामुळे विजेचे संकट निर्माण झाले आहे. अनेक शहरे काळोखा बुडालीआहेत. विजेची टंचाई दूर करण्यासठी चीनमध्ये शॉपिंग मॉल्स केवळ 5 तास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फॉक्सवॅगन, ऍपल आणि टोयोटा यासारख्या कंपन्यांच्या प्रकल्पांमधील काम बंद झाले आहे. चीनमध्ये 18 ऑगस्ट रोजी सिचुआन प्रांतातील चोंगक्विंग शहरात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. चीनमधील वाळवंटी भागाबाहेर नोंदविण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

Advertisement

देशाच्या मध्य तसेच दक्षिण-पश्चिम भागातील अनेक शहरांमधील तापमान 40 अंशांच्या पार पोहोचले आहे. याचबरोबर यांगत्जी नदी खोऱयातील शांघायला देखील उष्णतेचा तडाखा बसला आहे. चीनमधील 165 शहरे आणि काउंटीजना रेड अलर्ट हीट वॉर्निंग जारी करण्यात आला आहे. वाढते तापमान पाहता लोकांना घरातच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रचंड उष्णतेसह पावसाच्या अभावामुळे चीनच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. जुलै महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के कमी पाऊस पडला आहे. 1961 नंतर जुलै महिन्यात झालेला हा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. दुष्काळामुळे चीनच्या सिचुआन, हुबेई, हुनान, जियांग्शी, अनहुई आणि चोंगक्विंग प्रांतात लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दुष्काळामुळे लाखो लोकांना थेट मदत करण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रशासनाचे मानणे आहे.

चीन स्वतःच्या गरजेच्या सुमारे 15 टक्के वीज ही जलविद्युतद्वारे निर्माण करतो. परंतु कमी पावसामुळे त्याच्या जलविद्युत क्षमतेवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. तर उष्णता वाढल्याने चीनमध्ये एअरकंडिशनरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे पॉवर ग्रिडवर अतिरिक्त भार पडत आहे. विजेच्या टंचाईमध्ये मॉल खुले ठेवण्याची वेळ कमी करण्यात आली आहे.

कंपन्यांचे काम बंद

चीनच्या अनेक शहरांमधील निर्मिती प्रकल्प एक आठवडय़ापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनने चेंगदू शहरातील प्रकल्प वीजकपातीमुळे बंद असल्याची माहिती दिली आहे. काम बंद असल्याने वाहनांच्या पुरवठय़ाला विलंब होणार आहे.  ऍपल कंपनीची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉनने देखील स्वतःच्या प्रकल्पातील काम बंद ठेवले आहे. याचबरोबर टोयोटाच्या प्रकल्पातील काम रोखण्यात आले आहे. याचदरम्यान इलेक्ट्रिक वाहनांचे रिचार्जिंग स्टेशन्स बंद असल्याची तक्रार समोर आली आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयत्न अयशस्वी

चीनने भीषण उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून यांग्त्जी नदीच्या परिसरात पाऊस पडावा म्हणून क्लाउड सीडिंग ऑपरेशन देखील पार पाडले आहे. हुबेई आणि अन्य प्रांतांमध्ये हा प्रयोग पार पडला आहे, परंतु यात प्रशासनाला अपयश आले आहे.

Advertisement
Tags :

.