For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा धोका

06:39 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा धोका
Advertisement

 कंपनीची न्यायालयासमोर कबुली :  दुष्परिणाम अत्यंत दुर्लभ प्रकरणांमध्ये : भारतात याच फॉर्म्युल्याने कोविशिल्डची निर्मिती

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनची फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेकाने स्वत:च्या कोविड-19 लसीमुळे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात हे मान्य केले आहे. परंतु हे दुष्परिणाम अत्यंत दुर्लभ प्रकरणांमध्येच होऊ शकतात. अॅस्ट्राजेनेकाच्या फॉर्म्युल्याद्वारेच भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाने लस निर्माण केली होती. अॅस्ट्राजेनेकाच्या लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा तसेच अनेकांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागल्याचा आरोप आहे. कंपनीच्या विरोधात तेथील उच्च न्यायालयात 51 खटले सुरू आहेत. पीडितांनी अॅस्ट्राजेनेकाकडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

Advertisement

कोरोना लसीमुळे काही प्रकरणांमध्ये थ्रॉम्बोसिस थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच टीटीएस होऊ शकतो, असे कंपनीने ब्रिटिश उच्च न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये मानले आहे. टीटीएसमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात आणि प्लेटलेट्सची संख्या खालावते.

सर्वप्रथम ब्रिटिश नागरिकाकडून खटला

एप्रिल 2021 मध्ये जेमी स्कॉट नावाच्या ब्रिटिश नागरिकाने ही लस टोचून घेतली होती. यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने मेंदूवर प्रभाव पडला होता. याचबरोबर स्कॉटच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाला होता. मागील वर्षी स्कॉटने अॅस्ट्राजेनेका विरोधात तक्रार नोंदविली होती. मे 2023 मध्ये स्कॉटच्या आरोपांच्या उत्तरादाखल कंपनीने लसीमुळे टीटीएस होऊ शकत नसल्याचा दावा केला होता. परंतु चालू वर्षात उच्च न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर दस्तऐवजांमध्ये कंपनीने पूर्वीच्या दाव्यापासून माघार घेतली आहे. लसीमधील कुठल्या घटकामुळे हा आजार होतो यासंबंधीची माहिती सध्या कंपनीकडे नाही. या दस्तऐवजांची माहिती समोर आल्यावर स्कीटच्या वकिलाने अॅस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डच्या लसीत अनेक त्रुटी असून याच्या प्रभावाविषयी चुकीची माहिती देण्यात आल्याचा दावा न्यायालयात केला आहे.

लसीमुळे होणारे आजार

वैज्ञानिकांनी सर्वप्रथम मार्च 2021 मध्ये एक नवा आजार व्हॅक्सिन-इंड्युस्ड (लसीमुळे होणारा) इम्यून थ्रॉम्बोसिस थ्रॉम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची (व्हीआयटीटी) ओळख पटविली होती. व्हीआयटीटी प्रत्यक्षात टीटीएसचाच एक सबसेट असल्याचा दावा पीडितांच्या वकिलांनी केला होता. परंतु अॅस्ट्राजेनेकाने हा दावा फेटाळला आहे.

मापदंडांचे पालन केले : कंपनी

स्वकीयांना गमाविलेल्या किंवा गंभीर आजारांना तोंड द्यावे लागलेल्या लोकांबद्दल आमच्या संवेदना आहेत. रुग्णांची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. आमचे नियामकीय प्राधिकरण सर्व औषधे आणि लसींच्या सुरक्षित वापरासाठी सर्व मापदंडांचे पालन करते. वैद्यकीय परीक्षण आणि विविध देशांच्या डाटातून आमची लस सुरक्षेशी निगडित सर्व निकष पूर्ण करत असल्याचे सिद्ध झाले आहे. लसीमुळे होणारे फायदे याच्या दुर्लभ दुष्परिणामांपेक्षा खूपच अधिक असल्याचे जगभरातील नियामकांनी मानले असल्याचे कंपनीकडून म्हटले गेले.

60 लाख लोकांचा वाचविला जीव

एप्रिल 2021 मध्येच प्रॉडक्ट इन्फॉर्मेशनमध्ये काही प्रकरणांमध्ये टीटीएसच्या धोक्याचा मुद्दा समाविष्ट केला होता. कोरोना महामारीदरम्यान अॅस्ट्राजेनेकाची लस  आल्याने पहिल्या वर्षीच सुमारे 60 लाख लोकांचा जीव वाचल्याचे अनेक अध्ययनांमधून सिद्ध झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले होते. या लसीच्या सादरीकरणावेळी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याला ब्रिटिश सायन्ससाठी एक मोठा विजय संबोधिले होते.

ब्रिटनमध्ये होत नाही वापर

अॅस्ट्राजेनेकाच्या लसीचा आता ब्रिटनमध्ये वापर होत नसल्याचे समजते. लस उपलब्ध झाल्याच्या काही महिन्यांनीच वैज्ञानिकांना याच्या धोक्याची जाणीव झाली होती. अशा स्थितीत 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना अन्य कुठल्यातरी लसीचा डोस देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होत 81 जणांचा मृत्यू झाल्याचे मेडिसिन हेल्थकेयर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरीचे सांगणे आहे. तर दुष्परिणामांना सामोरे गेलेल्या प्रत्येकी 5 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये फेब्रुवारी महिन्यात 163 जणांना सरकारकडून भरपाई देण्यात आली होती. यातील 158 जणांना अॅस्ट्राजेनेकाची लस देण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.