उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर 8 एप्रिलला सुनावणी
मुख्यमंत्री शिंदे यांना 1 एप्रिलपूर्वी उत्तर दाखल करण्याचे निर्देश : विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयाकडून मागवली मूळ कागदपत्रे
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (युबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या याचिका एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सूचीबद्ध केल्या. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ठाकरे गटाच्या याचिकेशी संबंधित मूळ कागदपत्रे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाकडून मागवली आहेत. या प्रकरणावर आता 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर 1 एप्रिल किंवा त्यापूर्वी उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचा निकाल सभापती राहुल नार्वेकर यांनी दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर खासदारांना नोटीस बजावली होती. 10 जानेवारी रोजी झालेल्या निर्णयात, सभापतींनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवणारी ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली होती आणि शिंदे गटालाच खरी शिवसेना असे वर्णन केले होते. जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाला “खरा राजकीय पक्ष” म्हणून घोषित करण्याच्या सभापतींच्या आदेशाविऊद्ध उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्या दाव्याचीही दखल घेतली. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही शिंदे गटाच्या बाजूने हजेरी लावत अलीकडील निकालाचा संदर्भ दिला आणि उच्च न्यायालयाला ते ऐकून निर्णय घेण्याची मुभा द्यावी, असे सांगितले. आता 8 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालय अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्याबरोबरच ठाकरे गटाच्या याचिका कायम ठेवण्यासह मुद्यांवर निर्णय घेईल.