म्हादई प्रश्नी आव्हान अर्जावर 29 रोजी सुनावणी
विशेष प्रतिनिधी/ पणजी
म्हादई प्रश्नी आयोगाने दिलेल्या निवाड्यास गोव्याने न्यायालयात दिलेल्या आव्हान अर्जावर येत्या दि. 29 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीस बोर्डवर हे प्रकरण सुनावणीसाठी नमूद केले आहे.
या याचिकेला जोडून कर्नाटक सरकारची स्पेशल लिव पिटिशन गोवा विरोधातील ती देखील त्याचवेळी सुनावणी घेतली जाईल. गोवा सरकारच्या कर्नाटक सरकार विरोधात तीन याचिका बुधवारी दि. 29 रोजी सुनावणीला घेतल्या जाणार आहेत. याच याचिकेबरोबर म्हादई लवादाने दिलेल्या अहवालास महाराष्ट्र सरकारनेदेखील आव्हान दिले आहे. महाराष्ट्राने गोवा मुख्य अभियंत्यांविरोधात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी या सर्व याचिका दोनवेळा सुनावणीस येऊन गेल्या. प्रत्यक्षात सुनावणी झालेली नव्हती. आता प्रथमच या सर्व याचिका बुधवारी सुनावणीस येत आहेत. साऱ्यांचे लक्ष सदर याचिकांकडे लागून राहिले आहे.
गोवा सरकारची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना तसेच एसबीएन भट्टी यांच्यासमोर सुनावणीला येणार असून गोव्याची बाजू अॅड. दराईज खंबाटा हे सांभाळीत आहेत.
म्हादईवरील सभागृह समितीची तातडीची बैठक बोलवा : सरदेसाई
सर्वोच्च न्यायालयाने बुधवार 29 रोजी म्हादई प्रकरण सुनावणीसाठी सूचिबद्ध केले आहे. हे प्रदीर्घ विलंबानंतर घडले आहे. त्यामुळे गोवा आणि गोमंतकीयांना सध्या भेडसावणाऱ्या या सर्वांत ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवारी म्हादईवरील सभागृह समितीची तातडीची आढावा बैठक बोलवावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. समितीचे अध्यक्ष, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना याकामी पुढाकार घेण्याची मी विनंती करतो. मी नेहमी म्हटल्याप्रमाणे हा जगण्या-मरण्याशी संबंधित प्रश्न आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.