आमदार अपात्रताप्रकरणी आता सोमवारी सुनावणी
डॉम्निक नरोन्हांच्या याचिकेवर एका बाजूची सुनावणी
पणजी : सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर आलेल्या आठ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या तीन याचिकांवर गेले दोन दिवस झालेल्या सुनावणीमध्ये डॉम्निक नरोन्हा यांच्या याचिकेवर काल शुक्रवारी आमदारांच्या वतीने त्यांची बाजू मांडण्यात आली. आता सोमवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार असून ती मंगळवार व बुधवारपर्यंत चालणार आहे. इसवी सन 2022 मध्ये मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली आठ आमदारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते गिरीश चोडणकर तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पाटकर यांनी स्वतंत्रपणे अपात्रतेच्या याचीका सभापतींसमोर सादर केल्या होत्या. त्यानंतर डॉम्निक नरोन्हा यांचीही याचिका सभापतींसमोर सुनावणीसाठी आली. तिघांनी स्वतंत्रपणे सादर केलेल्या याचिकांमध्ये आठही आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
आपल्या याचिकेवर सभापतींसमोर सुनावणी होत नसल्याने गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशात सभापतींनी पाच नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर केवळ नरोन्हा यांच्या याचिकेवर गुऊवारी आणि काल शुक्रवारी सभापतींनी सुनावणी घेतली.
सोमवारी पुन्हा सुनावणी
दोन दिवस चाललेल्या सुनावणीत सभापतीसमोर चार जणांनी आपली बाजू मांडली. दुसरी बाजू ऐकून घेण्यासाठी सभापतींनी पुन्हा सोमवारी सुनावणी ठेवली आहे. ही सुनावणी मंगळवारी आणि बुधवारपर्यंत देखील चालू शकते. सभापती नरोन्हा यांच्या याचिकेवर 5 नोव्हेंबरपर्यंत निवाडा देऊ शकतात. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर गिरीश चोडणकर तसेच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पाटकर यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे. गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर सभापतींच्या कार्यालयातून अद्याप संबंधित व्यक्तींना नोटिसा निघालेल्या नाहीत.